Pimpri: सुविधा नाहीत, तर कर नाही…; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
Pimpri : प्रवेशव्दारावर फलक लावून रावेतमधील डीके इलेगन्स सोसायटीचा इशारा

पिंपरी – महापालिकेकडे नियमितपणे मालमत्ता कर भरूनही मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत, असा आरोप करत रावेत येथील डीके इलेगन्स सोसायटीच्या रहिवाशांनी “सुविधा नाही तर मालमत्ता कर नाही” अशी भूमिका घेतली आहे.
सोसायटीच्या प्रवेशद्वारावर फलक लावून रहिवाशांनी महापालिकेचा निषेध केला असून जोपर्यंत मुलभूत सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत मालमत्ता कर भरणार नसल्याचे सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले.
रावेत येथील चंद्रभागा कॉर्नर येथे डीके एलेगन्स नावाची सोसायटी आहे. येथील रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेला दरवर्षी नियमितपणे मालमत्ता कर भरला जातो.
मात्र, त्या बदल्यात सुरक्षित रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, प्रभावी घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था, प्रदूषणमुक्त परिसर आणि नियमित कचरा संकलन यांसारख्या मूलभूत सुविधा अद्यापही समाधानकारक पातळीवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
मुलभूत सुविधांचा बोजवारा…
रावेत परिसरात अनेक सोसायट्यांना पाणीटंचाई, टँकरवरील अवलंबित्व, वीजपुरवठ्यातील अडचणी, रस्त्यांची दुरवस्था आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या भेडसावत आहेत.
त्यामुळे सोसायटीच्या देखभालीवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत महापालिकेकडून ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत नोटिसा बजावल्या जात असल्या, तरी मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत प्रशासन उदासीन
असल्याचा आरोप सोसायटीधारक करत आहेत.
‘आम्ही वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रतिसाद शून्य आहे. आमच्या परिसरातील एकही आरक्षण विकसित नाही. मुलभूत सुविधा म्हणजे पाणी वेळेवर येत नाही. कचरा उचलला जात नाही. अंतर्गंत रस्त्यांचे डांबरीकरण केले जात नाही. प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या तातडीने सोडवाव्यात. अन्यथा मालमत्ता कर भरणार नसल्याचे आम्ही सर्व सोसायटीधारकांनी ठरविले आहे.’- प्रशांत क्षीरसागर, सदस्य डी.के एलेगन्स, रावेत
रहिवाशांच्या प्रमुख मागण्या…
– स्वच्छ व सुरक्षित रस्ते
– शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा
– प्रभावी घनकचरा व मलनिस्सारण व्यवस्था
– नियमित कचरा संकलन
– प्रदूषणमुक्त व सुरक्षित परिसर
– नागरी सुविधांबाबत प्रशासनाचा ठोस कृती आराखडा
सोसायटीच्या विंग – ४
सदनिका – ८२
सदनिकाधारकांना बिल – प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये
पाणी जोड – ४ नळजोड, अर्धा इंची
किती अपेक्षित – चारही विंग मिळून ८ अपेक्षित आहेत.
महापालिकेने नोटीस दिली नसून मालमत्ता कराची बिले दिले आहेत. जे दरवर्षी सोसायटी धारक भरतात. मात्र, त्यांनी यावर्षी भरणार नसल्याची भुमिका आहे.
मालमत्ता कर थकल्यास दंड लागतो का?
मालमत्ता कर वेळेत न भरल्यास थकीत रकमेवर दरमहा २ टक्के दंड आकारला जातो. वर्षभर कर न भरल्यास दंडाचा दर २४ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीचा कर नियोजित मुदतीत न भरल्यास पुढील कालावधीपासून दरमहा २ टक्के दंड लागू होतो.
ऑक्टोबर ते मार्च या सहामाहीच्या करालाही मुदत संपल्यानंतर दरमहा २ टक्के दंड आकारला जातो. त्यामुळे मालमत्ताधारकांना मुदतीत कर भरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येते.





