प्रभात वृत्तसेवा पिंपरी – केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा म्हणजेच पीएमएवाय २.० योजना सुरु केली आहे. या अंतर्गंत आवास योजनेतील लाभार्थ्यांना आता ३० चौरस मीटरऐवजी ४५ चौरस मीटर चटई क्षेत्राची मोठी सदनिका दिली जाणार आहे. योजनेतील नियम-अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आवास योजनेच्या दुसर्या टप्प्यात नऊ ठिकाणी भुखंड प्रस्तावित केले असून तेथे गृहप्रकल्प बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठी सदनिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी, पिंपरी हे प्रकल्प पूर्ण केले आहेत. तेथील घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण करण्यात आले. तर, डुडूळगाव प्रकल्पाचे काम सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले आहे. तर, रावेत प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली. मात्र, तेथील लाभार्थ्यांना किवळेमध्ये सदनिका देण्यात येत आहेत. ते सर्व प्रकल्प पूर्ण करण्यास ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तर, आता शासनाने पीएमएवाय २.० योजना जाहीर केली. या योजनेतून पिंपरी महापालिका शहरात हजारो सदनिका बांधणार आहे. आवास योजनेतील या दुसर्या टप्यात लाभार्थ्यांना मोठे घर मिळणार आहे. यापूर्वीच्या लाभार्थ्यांना ३० चौरस मीटर चटई क्षेत्राचे सदनिका दिलेली आहे. परंतु, आता ४५ चौरस मीटर चटई क्षेत्र असलेली सदनिका दिली जाणार आहे. याशिवाय, पात्र झोपडपट्टीवासीयांनाही या योजनेच्या कक्षेत घेण्यात आले आहे. महापालिकेने विकास आराखड्यातून आर्थिक दुर्बल घटक वर्गासाठी ९ भूखंड आरक्षित केले आहेत. तसेच, एचडीएच अंतर्गत अतिरिक्त भूखंड निश्चित केले आहेत. तेथे पीएमएवाय २.० अंतर्गंत गृहप्रकल्प उभारत सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यातून रावेत येथे गृहप्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. तसेच, परवडणाऱ्या घरांच्या व्याप्ती व गुणवत्तेमध्ये सुधारणेसाठी काही निकष लागू केले आहेत. त्यानुसार हा प्रकल्प राबवण्याचे नियोजन केल्याचे अधिकार्यांनी सांगितले. उत्पन्न मर्यादा ३ लाखांवरून ६ लाख.. शहरी भागातील नोकरदार वर्गाला उत्पन्न तीन लाखांपेक्षा अधिक असूनही घरांच्या किमती अधिक असल्याने घर घेता येत नाही. दुसरकीडे यापूर्वी पंतप्रधान आवास योजनेतून सदनिकेचा लाभ घेण्यासाठी ३ लाख उत्पन्नाची मर्यादा होती. ही मर्यादा ओंलाडणारे अनेक लाभार्थी अपात्र ठरत होते. मात्र, केंद्र शासनाने पीएमएवाय २.० मध्ये अटींमध्ये उत्पन्न मर्यादेत महत्त्वाचा बदल केला आहे. उत्पन्नाची मर्यादा ३ लाखांवरून ६ लाखांपर्यंत केली आहे. अनेक लाभार्थ्यांना आवास योजनेतून सदनिका मिळू शकणार आहे. “पिंपरी-चिंचवड शहरात पीएमएवाय २.० योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने राज्य व केंद्र सरकार यांच्याशी समन्वय साधून काम सुरु केले आहे. जेणेकरून पात्र शहरी नागरिकांना परवडणाऱ्या घरांचा लाभ मिळू शकेल. ही योजना टप्पाटप्प्याने व धोरणात्मक पद्धतीने राबविण्यात येईल. तसेच, वाढवलेली उत्पन्न मर्यादा, घराच्या किमान कार्पेट क्षेत्रफळामध्ये वाढ आणि झोपडपट्टीवासीयांचा समावेश, यामुळे पिंपरी चिंचवडमधील हजारो नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.” – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका