पिंपरी | वाहनाला आग, लोणावळ्यात वाहतूक ठप्प

लोणावळा, (वार्ताहर) – येथील कुमार रिसॉर्ट चौकात दुपारी २ वाजता एका चार चाकी वाहनाला अचानक लागलेल्या आगीमुळे मुंबई – पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी चौकात तैनात असलेल्या लोणावळा शहर वाहतूक पोलीस, वाहतूक वॉर्डन ,आणि नागरिकांनी त्वरा करीत आग आटोक्यात आणल्याने सदरची गाडी पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबई – पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गाने मुंबईकडून लोणावळ्याच्या दिशेने येत असलेली एक निसान कंपनीच्या गाडीच्या (एमएच ४६ एएल ४६८०) इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने गाडीने पेट घ्यातला.
प्रसंगावधान राखून चालकाने गाडी उभी केली आणि गाडीत बसलेल्या त्याच्यासह इतर तिघे गाडीतून बाहेर पडले चौकातच हा थरार घडत असताना ट्रॅफिक ड्युटीवर असलेल्या सहाय्यक फौजदार रमेश भिसे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, ट्रॅफिक वॉर्डन अनिल शिळवणे,
नितेश पडवळ, सिद्धेश चिंचोले आणि निखिल कदम यांनी बाजूलाच असलेल्या पेट्रोल पंपातून दोन तर शेजारच्या कुमार रिसॉर्टमधून एक असे तीन अग्निशमन सिलिंडर आणून त्याच्या आणि पाण्याच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
मात्र आग इंजीनमध्येच भडकत असल्याने गाडीचे बोनेट उघडण्याचे महत्त्वाचे काम आजूबाजूच्या दुकानदारांनी तसेच स्थानिक नागरिकांनी केले. त्यामुळे पोलिसांना त्यांची मोठी मदत झाली.
त्याच वेळी पोलिसांनी बाजूच्या लेनने चाललेला एक पाण्याचा टँकर थांबवून त्यातील पाणी गाडीच्या पेटत्या इंजिनवर सोडून दिले. यामुळे आग विझली गेली. त्यानंतर सर्वांनी सदरची गाडी मार्गावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.





