प्रभात वृत्तसेवा चिखली ( संतोष चव्हाण ) – पावसाळा सुरू झाला की सर्वत्र वृक्षारोपणाचे कार्यक्रम जल्लोषात पार पडतात. वाढदिवस, शासकीय उपक्रम, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये रोपे वाटली जातात. एखाद्याला रोप भेट देण्याचीही एक नवी चळवळ सुरू आहे. महापालिकाही दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून वृक्षारोपण करते. मात्र या रोपांचे पुढे काय होते? भेट दिलेली रोपे लावली जातात का? त्यांचे संवर्धन होते का? हे कोणीच पाहत नाही, आणि याचं उत्तर नेहमीच निराशाजनक असतं. जाधववाडीपासून कुदळवाडी ते जाधव सरकारकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकांवर मृत झाडं उभी आहेत. स्पाईन रोडवर मोडून पडलेले लिंबाचं झाड अजूनही त्याच अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी वाऱ्याने मोडलेल्या फांद्या पदपथावरच तशाच लटकत आहेत. अशा मृत झाडांचे खोड फुकट जाहिरातदारांनी ‘बोर्ड’ बनवले आहेत. केवळ खिळ्याऐवजी आता स्टेपलर वापरले जात आहेत! याहून गंभीर म्हणजे अनेक झाडांच्या मुळावरून इंटरनेट वायर टाकल्या गेल्या आहेत. यावर साखळदंड, बॉक्सेस आणि उपकरणे झाडांवरच अडकवली जात आहेत. हे सगळं होत असताना ‘वृक्षसंवर्धन’ हा शब्द केवळ भाषणांपुरता उरतो. उद्यान विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. वास्तविक, शहरांतील झाडांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे केवळ माणसांसाठीच नव्हे, तर पक्षी, कीटक आणि पर्यावरणासाठीही ही गंभीर बाब आहे. सिमेंटच्या जंगलात झाडं लावण्यासाठी जागाच उरत नाहीये. लोक आपल्या गॅलरीत कुंड्यांत झाडं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने आत्तापर्यंत लावलेली किती झाडे जगली याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात झाडांची स्थिती समाधानकारक असली, तरी शहरात झाडं जगवणं ही मोठी जबाबदारी ठरते. एखाद्या झाडाची तीन वर्षांपर्यंत अगदी पोटच्या मुलासारखी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ते झाड आपलं अन्न शोधून काढण्यास सक्षम होते. प्रत्येक घरास पार्किंगसारखं एक झाड तरी बंधनकारक असावं, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे. सोसायट्यांमध्ये ओपन पार्किंगच्या जागांमध्ये झाडं लावणं सक्तीचं करावं, असेही मत व्यक्त होत आहे. इव्हेंट नव्हे जबाबदारी हवी.. केवळ लाखो झाडं लावण्यापेक्षा, त्यातील किती जगली यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण एक झाड माणसांना श्वास देतं, सावली देतं आणि पृथ्वीचं संतुलन राखतं. त्यामुळे वृक्षलागवड ही एक ‘इव्हेंट’ न राहता, ती एक ‘सततची जबाबदारी’ बनवणं हे काळाचे आणि निसर्गाचेही आदेश आहेत! “आपण रोपटे दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही, तर ते रोपटे आपण ज्यांना दिले त्याचे ते काय करतात याची विचारपूस करणे देखील आपली जबाबदारी आहे. म्हणून पृथ्वीचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापुढे एक झाड लावावं व ते झाड जगवावं ही काळाची गरज आहे.” – वैष्णवी विनायक पाटील, अध्यक्षा, आरंभ फाउंडेशन