Pimpri News : शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रवी लांडगे यांनी पशुवैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, अर्चना सस्ते, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, मंदार देशपांडे, उत्तम केंदळे, संजय काटे, सुहास कांबळे, उपायुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. महापौर लांडगे यांनी शहरात श्वान संगोपन केंद्र उभारण्याबाबत विशेष भर देत, यासाठी प्रभागनिहाय उपलब्ध जागांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. या केंद्रांच्या माध्यमातून भटक्या श्वानांचे संगोपन, लसीकरण, उपचार तसेच नसबंदी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच शहरातील भटक्या व पाळीव श्वानांची अचूक संख्या, त्यांचे वितरण तसेच नसबंदी आणि लसीकरणाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे आदेश महापौरांनी दिले. शहरातील नागरिकांकडून येणाऱ्या श्वानांबाबतच्या तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निवारण करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने समन्वयाने काम करण्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे आरोग्य संवर्धन करणे तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे, असे निर्देशही महापौर रवि लांडगे यांनी यावेळी दिले.