Pimpari News : मावळ तालुक्यात खरीप हंगाम सन 2026 साठी कृषि विभाग व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. गट शेतीच्या माध्यमातून ही स्पर्धा राबविली जाणार आहे. असे मेनटॉर कृषि अधिकारी स्मिता कानडे व प्रियांका पाटील यांनी सांगितले. खरीप हंगाम सन 2026 मावळ तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी आता पर्यत 25 शेतकरी गटांनी भाग घेतला आहे. 15 गटाची स्पर्धेत भाग घेण्याची प्रक्रिया चालू आहे. गटामध्ये स्त्री, पुरुष शेतकऱ्याचा समावेश आहे. ही स्पर्धा एप्रिल 2026 पासून चालू झाली आहे. आतापर्यत एकूण 40 शेतकरी गटांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन रजिस्ट्रेशन केले आहे. ह्या स्पर्धे अंतर्गत शेतकरी गटांनी दशपर्णी अर्क सोहळा अंतर्गत आता पर्यत 2400 लिटर दशपर्णी अर्क बनविला आहे. ह्याचा उपयोग पिकावर येणाऱ्या कीड रोगासाठी केला जाणार आहे. मावळ तालुक्यातून मौजे कुसगाव पमा, चांदखेड, सोमाटणे, आढले बु, वराळे, मळवंडी ठुले, शिलाटणे,आढले खु.,शिरगांव, देवळे, नानोली तर्फे चाकण, जांभूळ, जेवरेवाडी, घोणशेत, पवळेवाडी, पुसाने, माळवाडी, वडगाव, वराळे, वाकसाई, शिलाटणे, सांगवी इ.गावातील शेतकरी गटांनी ह्यामध्ये सहभाग घेतला आहे. वॉटर कप स्पर्धेचा मुख्य उद्देश गट शेतीला चालना देणे, शेतकऱ्यांना गट करून एकत्रित शेतीचे महत्व समजावून सांगणे, कमी खर्चात जास्त उत्पादन घेणे, विषमुक्त शेती करणे, सेंद्रिय शेतीला प्रचार प्रसार करणे हा आहे असे मेंटॉर कृषी अधिकारी स्मिता कानडे यांनी सांगितले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. ह्या स्पर्धे मध्ये गटाद्वारे एकत्रित बियाणे खरेदी पासून ते उगवण क्षमता चाचणी, बिजप्रक्रिया, गादीवाफ्यावर रोपवाटिका, मशागत, चारसूत्री लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, पिकाची योग्य काढणी, काढणी पशाचत साठवण, विक्री याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे मेंटॉर कृषी अधिकारी प्रियांका पाटील यांनी सांगितले. मावळ तालुक्यातील गट शेतीसाठी ही खूप मोठी जागरूकता चळवळ आहे. शेतकऱ्यांना गटशेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचे महत्व या मधून समजणार आहे असे पाणी फाऊंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी ज्ञानेश्वर माने व मानसी बर्गे यांनी सांगितले. कृषि विभाग व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील 351 तालुक्यात करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातून स्पर्धेला मोठ्या प्रमाणात शेतकरी गटाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिल, पुरुष शेतकरी गटाद्वारे सहभाग घेत आहेत. निश्चितच मावळ तालुका ह्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करेल. – प्रतीक गुरव, क्षेत्रीय अधिकारी, पाणी फाऊंडेशन