प्रभात वृत्तसेवा देहूगाव – संत तुकाराम महाराजांचे तीर्थक्षेत्र असलेल्या देहू शहरात स्वच्छता, अतिक्रमण, वाहतूक कोंडी, अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, प्लास्टिक बंदी आणि मास विक्री यासंदर्भातील नियमावली केवळ कागदापुरती मर्यादित राहिली असून, प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. नगरपंचायत प्रशासनाकडून केलेल्या घोषणांचे अपयश दिवसेंदिवस उघड होत आहे.देहू हे दरवर्षी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याठिकाणी संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता, सुरक्षितता, शिस्तबद्धता आणि नियोजन अत्यावश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरात अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्ज यांचा सुळसुळाट झालेला आहे. विद्युत पोल, मुख्य प्रवेशद्वारे आणि चौकाचौकांत जाहिरातींचे बॅनर अनधिकृतरीत्या लावले जात असून, त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते.नगरपंचायतने प्लास्टिक बंदी, मास विक्रीवर बंदी, अतिक्रमण विरोधी कारवाई, अवजड वाहनांना प्रवेश बंदी, रस्त्यांवर स्वच्छता अशा अनेक मुद्द्यांवर नियमावली जाहीर केली आहे. पण ती नियमावली फक्त कागदावर आहे. ठिकठिकाणी हातगाड्या, अनधिकृत टपऱ्या, रस्त्यावरच मास विक्री आणि ढाब्यांमधील नॉनव्हेज पदार्थांची खुलेआम विक्री सुरूच आहे.तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून रस्ता रुंदीकरण, पदपथ आणि रिंगरोड बांधण्यात आले. अवजड वाहनांना शहरात प्रवेश न करण्याचे आदेश असतानाही हे वाहनचालक सर्रास शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरून प्रवेश करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. यात्रा काळात तात्पुरत्या स्वरूपात अतिक्रमणावर कारवाई केली जाते, पण दोन दिवसांत परिस्थिती पुन्हा जैसे थे होते, अशी नागरिकांची तक्रार आहे. स्वच्छतेच्या मोहिमांची केवळ दवंडी.. शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता अभियानासाठी लाखो रुपये खर्च करून प्रचार करण्यात येतो. पण प्रत्यक्षात शहरात कचऱ्याचे ढीग जागोजागी साचलेले आहेत. प्लास्टिक बंदी असूनही आठवडे बाजारात, हातगाड्यांवर, आणि दुकानदारांकडून खुलेआम प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. प्रशासनाकडून कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नसल्यामुळे दुकानदार निर्भयपणे नियम मोडत आहेत. अनधिकृत बांधकामे जोमात, प्रशासन कोमात.. नगरपंचायत हद्दीतील अनेक भागांत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ओढे-नाल्यांवर, सार्वजनिक रस्त्यांवर सर्रास अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. पत्राशेड, टेंट, लोखंडी ढाचे उभारून रस्त्यांवर अतिक्रमण वाढत आहे. हे सर्व उघडपणे घडत असूनही प्रशासन शांत आहे. देहू शहराच्या शिस्तबद्ध आणि भाविकांना पूरक व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन होत नाही. प्रशासनाकडून केवळ घोषणाबाजी केली जाते. ठोस अंमलबजावणी आणि कारवाईचा अभाव असल्याने शहराचा अनुशासन बिघडत चालल्याची भावना नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.