Pimpari News : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल या शाळेने इयत्ता १२ वी (सीबीएसई) बोर्ड परीक्षेत यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकाल मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत गायत्री कुंभार हिने ९६.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिने भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि योगा या विषयांत प्रत्येकी ९९ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. ओंकार गायकवाड याने ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. आयटी विषयात त्याने १०० पैकी ९९ गुण मिळवले. अनशूल पनवेलकर याने ९१.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय वेदांत पाटील, क्रितीग्या सिंग, अक्षय उलियाथ आणि आदित्य यांनीही ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत असल्याची भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा तसेच संचालिका डॉ. तेजल शहा यांनी शाळेच्या प्राचार्या डॉ. वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्या लिझा सोजू, समन्वयिका गुलनाज खान, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.