प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – सातत्याने अवजड वाहनांमुळे होत असलेल्या प्राणांतिक अपघातांच्या बाबतीत पोलीस प्रशासन आता सजग झाले आहे. अलिकडेच पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाली होती आणि काही निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्यात आयुक्तालयाच्या हद्दीतील आर एम सी प्लांट चालक व मालक यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीस एकूण 38 आरएमसी चालक-मालक उपस्थित होते.या बैठकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी आर एम सी प्लांट मालकांना आरएमसी प्लांट मालकांना सुरक्षित वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच निर्देश देण्यात आले. यात प्रामुख्याने वाहनचालकाने वाहन चालविताना मोबाइलचा वापर करु नये. वाहनचालकाने मद्यप्राशन अथवा कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही याबाबत खात्री करुनच, त्यास वाहन चालविणेस दयावे. वाहनचालकाची वर्तणूक व घटनेची जबाबदारी तपासण्यासाठी वाहनाममध्ये कॅबिन आणि डॅशबोर्ड कॅमेरे बसवावेत. आरएमसी प्लांट मालकांनी वाहनावर वाहनचालकासोबत क्लिनर ठेवावा. वाहनचालकांनी रस्त्यावर दुरुस्तीचे काम चालू असल्यास, अशा ठिकाणी विशेष लक्ष देऊन वाहन चालवावे. वाहनास साइड बंपर बसवावेत. नियमाचे व वेळेचे पालन करुन, प्रवेशबंदी केलेल्या कालावधीमध्ये वाहन चालवू नये. वाहनचालकास वेळोवेळी वेग मर्यादेबाबत सूचना द्याव्यात. नियमितपणे वाहनाचे ब्रेक, टायर्स, लाइट, टायर प्रेशर व महत्त्वाच्या उपकरणांची स्थिती तपासून, वाहन सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतरच वाहन रस्त्यावर आणावे. वाहनचालाकाकडुन अपघात झाल्यास, त्याबाबतची तात्काळ माहिती पोलीसांना कळवावी.या बैठकीत हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक सोनवणे, हिंजवडी वाहतूक विभाग व सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात, वाकड वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.