प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील शवागृहाच्या आवारात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पार्किंगचा प्रकार वाढत आहेत. या परिसरातील चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आहे. रुग्णांचे नातेवाईक, पोलीस व डॉक्टरांसाठी राखीव असलेल्या पार्किंगमध्ये आता टपरीधारक, दुकानदार आणि काही रुग्णवाहिका चालकांनी ‘मुक्तसंचार’ माजवला आहे.सेवागृह परिसरातील पार्किंग प्रत्यक्षात रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचारी यांच्यासाठीच राखीव आहे. मात्र, आसपासच्या टपऱ्या व दुकाने चालविणारे व्यावसायिक आपल्या चारचाकी व दुचाकी वाहनांचे पार्किंग शवागृहाच्या आवारात करीत आहेत. त्यातच काही खाजगी रुग्णवाहिका चालकांनी राजकीय ओळखीच्या बळावर आपल्या खासगी रुग्णवाहिका देखील शवागृहाच्या आवारात नेऊन उभ्या करणे सुरू केले आहे. या मनमानीमुळे रुग्णांचे नातेवाईक आणि पोलिसांना त्रास सहन करावा लागत आहे. सुरक्षा रक्षकांनी काही वेळा या बेकायदेशीर पार्किंगला आळा घालण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिक दुकानदारांकडून त्यांनाही धमक्या आणि दादागिरीचा सामना करावा लागला आहे. एवढेच नव्हे, तर काही रुग्णवाहिका चालक आणि बाहेरील लोक शवागृह परिसरातील स्वच्छतागृह व इतर सुविधा बिनधास्तपणे वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अमली पदार्थांचा संशयित रस्ता.. शवागृह परिसरात पार्क करण्यात येणाऱ्या काही वाहनांचा वापर अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याची चर्चा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. मात्र, आतापर्यंत पोलिसांनी या ठिकाणी एकदाही तपास किंवा कारवाई केलेली नसल्याचे समजते. “वायसीएम रुग्णालयाच्या शवागृहाच्या आवारात इतर कोणी अनधिकृतरित्या पार्किंग करत असेल, तर त्यांना पुढील काळात पार्किंग करण्यास मज्जाव केला जाईल. याबाबत पोलिसांनाही कळविण्यात येईल.” – अभय दादेवार, अधीक्षक, वायसीएम रुग्णालय