Pimpri News: शहरातील सोसायट्यांना ५० टक्केच पाणी; भामा-आसखेडचे पाणी येईपर्यंत पूर्ण पुरवठा अशक्य
Pimpri News: वाकडमधील ३४ गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवासी त्रस्त

पिंपरी – शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडत असल्याने वाकड परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वाकडमधील सुमारे ३४ गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या आवश्यकतेच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाणीपुरवठा महापालिकेकडून केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या सोसायट्यांमध्ये प्रत्येकी सुमारे २०० ते ५०० सदनिका आहेत. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा भरून काढण्यासाठी रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
वाकड परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. टोलेजंग इमारती, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि वाढती लोकसंख्या यामुळे या भागातील पाण्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. मात्र, त्याप्रमाणात महापालिकेच्या पाणीपुरवठ्याची क्षमता वाढलेली नसल्याने अनेक सोसायट्यांना नियमित पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे.
या भागातील ३४ सोसायट्यांना आवश्यक असलेल्या पाण्याच्या तुलनेत सध्या केवळ निम्माच पुरवठा होत असल्याने उर्वरित गरज भागविण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची मागणी आणखी वाढल्यास टँकरची संख्या आणि त्यावरील खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी सोसायटीधारकांकडून होत आहे.
वाकडमधील या सोसायट्यांना शंभर टक्के पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे रहिवाशांकडून मागणी करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या उपलब्ध पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण असल्याने तातडीने पूर्ण क्षमतेने पाणी देणे शक्य नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भामा-आसखेड प्रकल्पाचे पाणी शहराला उपलब्ध झाल्यानंतरच या भागातील पाणीपुरवठ्यात वाढ करणे शक्य होईल, अशी भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेतली आहे. त्यामुळे भामा-आसखेडचे पाणी वाकडमधील या सोसायट्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसंख्या वाढली; पाण्याची व्यवस्था मात्र अपुरी
वाकडसह पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. हजारो नवीन सदनिका निर्माण झाल्याने या भागातील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची पायाभूत व्यवस्था पुरेशी सक्षम झाली नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
नवीन गृहप्रकल्पांना परवानगी देताना भविष्यातील पाण्याची गरज, उपलब्ध पाणीपुरवठा क्षमता आणि वितरण व्यवस्था यांचा पुरेसा विचार झाला आहे का, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. सदनिका वाढत असताना पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
टँकरचा खर्च रहिवाशांच्या माथी
महापालिकेकडून मिळणारे पाणी अपुरे असल्याने सोसायट्यांना नियमितपणे टँकर मागवावे लागतात. त्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च अखेर रहिवाशांकडूनच सोसायटीच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे महापालिकेचा अपुरा पाणीपुरवठा आणि त्यातून निर्माण होणारा टँकरचा आर्थिक भार अशी दुहेरी झळ रहिवाशांना सहन करावी लागत आहे.
Baramati : बारामतीत मतदारांना पैसे वाटपाचा आरोप; व्हिडिओ व्हायरल





