प्रभात वृत्तससेवा पिंपरी – सध्या शहरात सुसरू असलेल्या श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या 464 व्या समाधी संजीवन सोहळ्यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अत्यंत सुंदर मिश्रण दिसून येत असून धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांनी पिंपरी-चिंचवडकरांनी विविध कलाकारांच्या कलांचा आनंद घेता येत आहे. तसेच सामााजिक उपक्रम देखील सुरु आहेत. यात प्रामुख्याने श्रींची महापूजा, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, महासाधू मोरया गोसावी महाराज यांचे चरित्र पठण, नेत्र व दंत चिकित्सा शिबिर, यापुढे दर संकष्टी चतुर्थीला नित्यनेमाने होणारी पवनामाईची आरती या आगळ्यावेगळ्या पण अतिशय स्तुत्य आणि सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करता येईल. रविवारी प्रख्यात चौघडा वादक नितीन दैठणकर यांच्या कलाविष्कराने सकाळ रम्य झाली, यानंतर श्रीची महापूजा चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संस्कृती संवर्धन विकास महासंघ आणि स्थानिक शाळा यांच्या सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने एक वेगळेच पवित्र्य परिसरात अनुभवता आले. यानंतर मोरया गोसावी महाराजांचे चरित्र पठण, श्रीचा सामुदायिक अभिषेक झाला. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि राजू शिवतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्र व दंत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले सोबतच रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. यात अनेक दात्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. दुपारी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. दुपारी स्थानिक भजनी मंडळाच्या वतीने तीन तास भजन सेवा करण्यात आली. त्यानंतर मानसी बडवे यांच्या कीर्तनाचे आयोजन झाले. यावर्षी पासून प्रती चतुर्थीला पवनामाईचे पावित्र्य राखण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी तिची आरती करण्याचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रमाची सुरुवात झाली, आजच्या पहिल्या आरतीला चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, ॲड. देवराज डहाळे उपस्थित होते, कालभैरवनाथ उत्सव समितीचे आवेश चिंचवडे, गणेश मिरजकर यांच्या हस्तेआरती झाली आणि पवनानदीचे पावीत्र्य जपण्याचा संकल्प ही करण्यात आला. यानंतर योगेश सोमण यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या आनंदडोह या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दुसऱ्या दिवशी सारेगमप लिटल चॅम्प्स पहिल्या पर्वाची लाडकी जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या जोडीने आपल्या ‘मर्मबंधातली ठेव’ या संगीत रजनीच्या कार्यक्रमाने शब्दश:मंत्रमुग्ध केले.