प्रभात वृत्तसेवा पिंपरी – घरगुती किरकोळ कारणावरून विवाहितेला मारहाण व शिवीगाळ करत मानसिक व शाररीक त्रास दिला. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिरंगुट व लवळे (ता. मुळशी) येथे घडली.समीना सुलतान शेख (वय २०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सुलतान रमजान शेख, लायक रमजान शेख आणि रमजान शेख (तिघेही रा. लवळे, ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अब्दुलनबी रज्जाक शेख (वय ४५, रा. गांधीचौक, यादगीर, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) यांनी शनिवारी (दि. २) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.ही घटना २०२२ ते १ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मुळशी तालुक्यातील पिरंगुट आणि लवळे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांची मुलगी समीना सुलतान शेख (वय २०) हिला शिवीगाळ, मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यामुळे तिने १ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.