प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दसरा सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील फुलांच्या बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी बहरल्या आहेत. पारंपरिकरीत्या दसऱ्याच्या दिवशी घराघरात तसेच देवस्थळांवर झेंडूच्या फुलांच्या माळा सजविण्याची प्रथा आहे. त्यामुळे झेंडूची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी बुधवारी (दि. १) मोठी गर्दी केली होती. फुलांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दसऱ्यात झेंडूच्या माळा व तोरणांना विशेष महत्त्व आहे. यामुळे ग्रामीण भागातून झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून व्यापाऱ्यांनी प्रति किलो १०० रुपये असा दर लावला आहे. काही ठिकाणी गुणवत्तेनुसार हा दर अधिक घेतला जात असल्याचेही चित्र दिसत आहे. मोठा गोंडा १५० रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. मागणी मोठी आणि पुरवठा मर्यादित असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठा, जसे की चिंचवड, पिंपरी, भोसरी, निगडी आणि आकुर्डी परिसरात फुलांच्या गाड्यांवर व दुकांनांवर झेंडू फुलांची रेलचेल दिसत आहे. तसेच सजावटीसाठी इतर फुले देखील बाजारात उपलब्ध आहेत. सकाळपासूनच ग्राहक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येत होते. महिलांनी घरसजावटीसाठी तसेच मंदिरे, देवघर आणि वाहन सजावटीसाठी झेंडू खरेदीला प्राधान्य दिले आहे. हा दर दिवाळीपर्यंत टिकून राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दसऱ्याच्या उत्सवामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बाजारपेठा गजबजल्या आहेत. व्यापाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा व्यवसाय तेजीत आहे. गुरुवारी खरेदीचा जोर आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे दसऱ्याच्या पारंपरिक सणाला रंगत आणणाऱ्या झेंडूच्या फुलांची बाजारपेठ खर्या अर्थाने उजळून निघाली आहे. आंबा, आपट्याच्या पानांना मागणी.. तोरण करण्यासाठी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. तर दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. हे सोने लुटण्यासाठी आपट्यांच्या पानांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. बाजारात २० रुपये याप्रमाणे आपट्याची पाने उपल्बध आहेत. तर दहा रुपये याप्रमाणे आंब्याची पाने मिळत आहेत. वस्तू खरेदीसाठी झुंबड.. दसऱ्याच्या शुभमूहर्तावर घरामध्ये नवीन वस्तू घेण्याची परंपरा आहे. या शुभदिवशी आपल्या घरामध्ये नवीन वस्तू आण्यासाठी शहरातील विविध दालनामध्ये गर्दी केली आहे. टीव्ही, फ्रीज, एसी, संगणक, मोबाईल, ब्रँडेड घड्याळे, फर्निचर, किचनमधील विविध वस्तू घेण्यासाठी नागरिकांनी बुधवारी शोरुममध्ये गर्दी केली होती. सोने-चांदीच्या खरेदीला उत्साह.. शुभमूहर्तावर सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल असतो. सोने व चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दसर्याच्या मूहर्तावर सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी केली होती. सद्यस्थितीत सोने १ लाख १५ हजार ३७० रुपये प्रतीतोळा याप्रमाणे भाव आहे.