प्रभात वृत्तससेवा पिंपरी – शैक्षणिक वातावरण समृद्ध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या करिअर संधीला बळ मिळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निकच्या संगणक विभागाने एन्थ्रॉलटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि फोराईज सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला . हा करार सैद्धांतिक ज्ञान आणि औद्योगिक पद्धतींमधील अंतर भरून काढणारा दूरगामी दृष्टिकोन दर्शवत दीर्घकालीन ध्येय साध्य करण्याची शाश्वती प्रदान करतो . एनथ्रॉलटेक प्रायव्हेट लिमिटेड हे एक आघाडीचे एजंटिक ए. आय-संचालित, एंटरप्राइझ-क्लास स्किलिंग प्लॅटफॉर्म असून फोराइज सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आयटी इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्सी, ऑनसाइट ऑफसाइट सेवा, कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर व अप्लिकेशन टेस्टिंग आणि एंटरप्राइझ आर्किटेक्चर कन्सल्टिंगसह व्यापक सेवा पुरवते . ही भागीदारी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, कॅम्पस ड्राइव्हद्वारे पूर्ण-वेळ प्लेसमेंट संधी, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि बूट कॅम्प, संसाधने किंवा नाविन्यपूर्ण प्रकल्पांना मार्गदर्शन प्रदान करेल. संगणक शाखेचे विभाग प्रमुख विकास सोळंके आणि पॉलिटेक्निकचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी गणेश म्हाळंकर ह्यांचा उपस्थितीत हा करार एन्थ्रलचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर इनामदार, फोराइज सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे गजानद बिराजदार , सुनील देवकुळे व मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निकच्या प्राचार्या गीता जोशी यांच्या स्वाक्षरीने पूर्ण झाला. “हा सामंजस्य करार विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर स्पर्धात्मक जागतिक परिदृश्यात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या औद्योगिक क्षमतांनी सक्षम करण्याच्या महाविद्यालयाच्या ध्येयाची पुष्टी करतो ” असे संस्थेचे कार्याध्यक्ष बी.जी. जाधव ह्यांनी म्हणत सर्वांचे अभिनंदन केले .