Pimpari News : खालापुर तालुक्यातील ग्रामीण भागामधील अनेक रस्ते नूतनीकरण करण्यात आले आहेत, परंतु गेल्या काही वर्षापासून काही रस्ते अजूनही खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याने याचा नाहक त्रास प्रवासी वाहनचालक व पादचारी मंडळींना करावा लागत आहे. डोलवली रस्तावर गेल्या काही वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. काल मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत येथील लोकप्रतिनिधी या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात अयशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीही येथील प्रवासी आणि वाहनचालकांना डबक्यातून प्रवास करावा लागणार आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे येथील ग्रामस्थांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. येथील ओव्हरलोड वाहतुकीला कोणाचा वरदहस्त आहे. असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. २२ मे रोजी खालापुर तालुक्यासह खोपोली शहरात मुसळधार पावसाने मोठा धुमाकूळ घालत मोठी बरसात केली. या अवकाली पावसामुळे लग्न सोहळा, वीट भट्टी व्यवसाय, उघड्यावर राहणारे कुटुंब यांसह अनेकांचे मोठे नुकसान केल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्यांच्या विळख्यात सापडलेल्या डोलवली गावच्या मुख्य रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या डबक्यांतून प्रवास करणे वाहनचालकांना मोठे कसरतीचे बनले होते. या रस्त्याची दुरुस्ती अथवा नूतनीकरण संबंधित ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधींना आलेले अपयश असून तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ओव्हरलोड वाहतुकीमुळे येथील रस्ता मोठ्या अपघाताला आमंत्रण ठरेल अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.