pimpri news : थेरगावात फटाक्यांच्या जाहिरातीसाठी ‘गोळीबार रील’

गुन्हेगारीचे उदात्तीकरण; ‘रील’ बनवणाऱ्यांना पोलिसांचा धडा!
पिंपरी – दिवाळीपूर्वी फटाक्यांची विक्री वाढवण्यासाठी थेरगाव परिसरातील काही तरुणांनी ‘गुंडगिरी स्टाइल’ जाहिरातीचा अवलंब करून टोळीयुद्धाचा बनावट प्रसंग साकारला. या तरुणांनी गोळीबाराच्या दृश्यांसह थरारक रील तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केली होती. ही रील काही तासांतच व्हायरल झाली. पोलिसांनाही या प्रकरणी लक्ष घालावे लागले.
या रीलची सुरुवात ‘पिंपरी चिंचवड मधील थेरगाव थेरगाव भागात खुलेआम घडलेला प्रकार !’ अशा उत्तेजक कॅप्शनने होते. पिवळ्या कपड्यांतील तरुण हातात पिस्तुलांसह गुंडांच्या थाटात अभिनय करताना दिसत आहे. थरारक गोळीबाराच्या दृश्यानंतर शेवटी फटाक्यांच्या स्टॉलचे नाव आणि पत्ता दाखवला जातो. म्हणजेच, लोकांच्या कुतूहलाचा फायदा घेत थरारातून थेट जाहिरात करण्याचा हा ‘फटाका मार्केटिंग ट्रेंड’ ठरला.
या वास्तवदर्शी दृश्यांमुळे काही नागरिकांनी ती खरी घटना समजल्याने परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. सोशल मीडियावर मात्र या रीलविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. “जाहिरात करायची तर करा, पण गुन्हेगारीचा थाट दाखवून नव्हे,” असा नागरिकांचा रोष व्यक्त झाला.
पोलिसांची कारवाई आणि पुढील निर्देश
रील व्हायरल झाल्याचे समजताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी तत्काळ पथकाला तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी ही रील तयार करणारे तरुण तसेच संबंधित फटाक्यांच्या विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. त्यांना योग्य भाषेत समज देत भविष्यात अशा कृतींपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला. तसेच, त्यांच्याकडून माफीनामा तयार करून तो त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करण्याचे आदेश पोलिसांनी दिले.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी पूर्वीही समाजमाध्यमांवर ‘भाईगिरी’ किंवा गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रील्स बनवणाऱ्या तरुणांना वठणीवर आणले आहे. नागरिकांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणारा, हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा अथवा भीती निर्माण करणारा कोणताही सोशल मीडिया कंटेंट स्वीकारार्ह नाही, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
अशा प्रकारची मस्ती खपवून घेतली जाणार नाही. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे रील्स बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
– शत्रुघ्न माळी, वरिष्ठ निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे





