Pimpari News : भोसरी एमआयडीसीतील टी-ब्लॉक परिसरातील ‘एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल’च्या इमारतीत गुरुवारी (दि. २१) दुपारी आग लागल्याने (Pimpari News) परिसरात एकच खळबळ उडाली. शाळेच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली असून धुराचे लोट थेट चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. शाळेच्या पहिल्या मजल्यावरील एका वर्गात अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला (Pimpari News) माहिती देण्यात आली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तत्काळ आग नियंत्रणात आणत मोठा अनर्थ टाळला. प्राथमिक माहितीनुसार, एसी ट्रिप झाल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत एक ते दोन खोल्यांचे नुकसान झाले असून फर्निचर, विद्युत साहित्य आणि काही शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत धूर पसरल्याने (Pimpari News) काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अग्निशमन विभागाने वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे आग इतर मजल्यांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. दरम्यान, शहरातील खासगी शाळांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा कागदावरच असल्याची टीका वारंवार होत असताना, या घटनेनंतर महापालिका प्रशासन सर्व शाळांची अग्निसुरक्षा तपासणी करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.