प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आरटीओचा दंड आणि कर भरण्याची सुविधा देण्याच्या नावाखाली एका ॲपच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. यामुळे अशा कोणत्याही अॅपचा वापर न करता वाहनधारकांनी दंड आणि कर भरण्यासाठी www.echallan.parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.वाहनधारकांना आता ऑनलाइन दंड ठोठावला जातो. आॅनलाइन दंड आणि कर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याचाच गैरफायदा घेत ॲपद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामुळे अशा प्रकारच्या ॲपच्या माध्यमातून दंड किंवा कर भरु नये. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दंड व कर आकारणीसंबंधी कोणतेही संदेश व्हॉट्सॲपद्वारे पाठवले जात नाहीत. कार्यालयीन कामकाजासंदर्भातील संदेश केवळ टेक्स्ट मेसेज (एसएमएस) स्वरूपात वाहनधारक आणि अनुज्ञप्तीधारकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवले जातात. त्यामुळे नागरिकांनी ‘ई-चलान एपीके’ या संशयास्पद ॲप किंवा संकेतस्थळावर दंडाची रक्कम भरू नये, असे जाधव यांनी सांगितले. वाहनधारकांनी दंड आणि कर भरण्यासाठी केवळ www.echallan.parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे. अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ॲप किंवा वेबसाइटवर आर्थिक व्यवहार करणे टाळावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. यामुळे आर्थिक फसवणुकीला आळा बसण्यास मदत होईल. ‘ई-चलान एपीके’ सारख्या संशयास्पद ॲप्सवर विश्वास ठेवू नये, व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या चलान संदेशांवरून पैसे भरू नयेत. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या टेक्स्ट मेसेजची खातरजमा करावी.