प्रभात वृत्तसेवा पिंपरी – लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गती मिळाली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर इंद्रायणी नदी सुधारअंतर्गंत विविध कामांसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने एकूण ४४३ कोटी ५१ लाख १० हजार १५२ रुपयांची निविदा काढली आहे. कंत्राटदारांना १८ डिसेंबर २०२५ पर्यंत निविदाप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यामध्ये प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रणासह इंद्रायणी नदी काठ सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तळवडेपासून चऱ्होलीपर्यंत सुमारे २०.६ किलोमीटर परिसरातून इंद्रायणी वाहते. नदीच्या उत्तरेस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) हद्द आहे. यामध्ये येलवाडी, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धोनोरे आदी गावांचा समावेश आहे. नदीकाठी देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र आहेत. आषाढी, कार्तिकी, संत तुकाराम महाराज बीज सोहळा यांसह वर्षभर वारकरी या दोन्ही तीर्थक्षेत्रावर येतात. इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. मात्र, नदी प्रदूषित झाल्याने स्नान करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अनेक शहरे, गावे आणि औद्योगिक परिसरातील सांडपाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण वाढले. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन-2020’ या अभियानामध्ये ‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चर्चेत राहिला. राज्य शासनाची पर्यावरण समिती आणि राज्य स्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेसाठी हा प्रकल्प प्रलंबित होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण समितीची मान्यता घेण्यासाठी सकारात्मक सहकार्य केले. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य स्तरीय तांत्रिक समितीची मान्यता देण्यासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने आता निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘इस्टिमेंट कमिटी’समोर हा विषय ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली. त्यानंतर आता निविदा प्रसिद्ध केली आहे. “इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी सर्व प्रशासकीय, तांत्रिक मान्यता आणि निधीची उपलब्धता करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. तसेच, नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना दोन ठिकाणी ६० एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र या कामामध्ये प्रस्तावित केलेले आहेत. तसेच, प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रण आणि नदीकाठ सुशोभिकरणाच्या कामांचा या निविदेत समावेश आहे.” – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण प्रेमींच्या सूचनांचा अंतर्भाव… आमदार लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर आणि परिसरातील पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना महापालिकेच्या मास्टर प्लॅनमध्ये दर्शवल्यानुसार विविध ठिकाणी 60 एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे. तसेच, वाॅटर एटीएम, सार्वजनिक शौचालय, स्ट्रीट फर्निचर, चेन लिंक फेन्िसंग कम्पाउंड वाॅल आणि बायोडायव्हर्सिटी पार्क इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अमृत- 2 उपक्रमांतर्गत या प्रकल्पाचे काम होणार आहे.