pimpri news : भाजप कार्यकारिणीत आता थेट भरती

ज्येष्ठ नागरिकांना मात्र नो एन्ट्री
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण राज्यात विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी थेट कार्यकारिणमध्ये थेट मेगा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही भरती करताना ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कार्यकारिणीमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातही बहुतांश सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यात भाजपही मागे नाही. याउलट आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्णय भाजपने १८ सप्टेंबर रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० ते ६० वयोगटातील महिला व पुरूष यांना कार्यकारिणीमध्ये घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यकारणीचा विस्तार करण्यात येणार असला तरी त्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कार्यकारिणीवर घेतले जाणार नसल्याचेही पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पक्षाचा विस्तार करण्याचे धोरण केंद्रीय आणि राज्य पातळीवर आखण्यात आले असले तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी या धोरणापासून अनभिज्ञ आहेत. पक्षाच्या बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कार्यकत्र्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
भाजप राज्यात सत्तेवर असल्याने अनेकजण पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेण्यास इच्छुक आहे. यातील अनेकजण सामाजिक कार्यकर्ते आहेत. विविध आंदोलने करताना त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत. मात्र कार्यकारिणीसाठी अर्ज करणा-यावर एकही गुन्हा दाखल नसावा, ही प्रमुख अट टाकण्यात आली आहे.
तसेच कार्यकारिणीसाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर देण्यात आली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या या पत्राची प्रत कोणत्याही स्थानिक पदाधिकारी यांना न पाठविता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मंत्री जयप्रकाश नड्डा, भाजप केंद्रीय मुख्यालय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.





