Pimpri News : देहू नगरपंचायतीकडून करदात्यांसाठी आकर्षक बक्षीस योजना

२० नोव्हेंबरपर्यंत कर भरणाऱ्यांना मिळणार संधी
देहूगाव – देहू नगरपंचायतीच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मालमत्ता व पाणीकर थकबाकीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी नगरपंचायतीने यंदाही लकी ड्रॉ योजना जाहीर केली आहे. २० नोव्हेंबरपर्यंत थकबाकी कर भरणाऱ्या सर्व करदात्यांना लकी ड्रॉद्वारे ५० आकर्षक गृहउपयोगी वस्तूंची बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे कर विभाग प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.
गेल्यावर्षी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन, यंदाही शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. २० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण कर भरणाऱ्या प्रत्येक करदात्यास एक कूपन देण्यात येईल. या कूपनमधून लकी ड्रॉद्वारे ५० भाग्यवान करदात्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. नगरपंचायतीने नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले असून, कर वसुलीतून नगरविकासासाठी निधी उपलब्ध होतो, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
घरबसल्या कर भरा
कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून, नागरिकांनी नगरपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या डिजिटल माध्यमातून कर भरता येतो. ज्या नागरिकांना कराची पावती प्राप्त झालेली नाही, त्यांनी नगरपंचायतीच्या संकेतस्थळावरून पावती डाउनलोड करावी अथवा ती नगरपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





