प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या बटरफ्लाय पुलाला आता नागरिकांच्या उत्साहाचा त्रास होऊ लागला आहे. पुलावरच धोकादायक पद्धतीने दुचाकी लावून तरुण मंडळी थांबलेली असतात. पुलावरुन पायीच रस्ता क्राॅस केला जातो. पदपथाएवजी पुलावरील रस्त्यावर गप्पांची मैफिल रंगविली जाते. कचरा पुलाच्या किनाऱ्यालाच फेकला जातो. अजूनही पुलाच्या सुरुवातीला बांधकाम साहित्य पडून आहे. या प्रकारांमुळे देखणा बटरफ्लाय पूल अपघाताचे कारण बनू शकतो.थेरगाव आणि चिंचवडला जोडणारा ‘बटरफ्लाय पूल’ पवना नदीवर आहे. हा पूल दिसायला आकर्षक असून त्याला रंगीबेरंगी रोषणाई देखील करण्यात आली आहे, ज्यामुळे तो एक आकर्षणाचे केंद्र बनला आहे.पवना नदीवर, थेरगाव आणि चिंचवडगावाला जोडणाऱ्या या पुलाची संरचना फुलपाखरासारखी असून या पुलासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हा पूल बनविताना अभियां.ित्रकीचे कौशल्य पणाला लावण्यात आले असून पवना नदीच्या पात्रात एकही पिलर न उभारता हा पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदी कोणत्याही अडथळ्याविना वाहत आहे. बटरफ्लाय प्रकारातील राज्यातील हा पहिलाच पूल आहे.परंतु आता या पुलावर उत्साही तरुण-तरुणी दुचाकी लावून गप्पा मारत असतात. दोन्ही बाजूला पदपथ असतानाही रस्त्यावरच थांबण्याचा यांचा हट्ट अपघाताचे कारण बनू शकतो. एवढेच नव्हे तर दुभाजकावर बसून गप्पा देखील मारतात. येथील रंगीत आकर्षक विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी आणि रात्री फोटोसेशन व रील्स बनविण्यासाठी तरुण-तरुणींची गर्दी होत असते. यांचा अति उत्साह अपघाताचे कारण ठरु शकतो. तसेच या पुलाला पिकनिक स्पाॅट बनवून येथेच खाऊन-पिऊन कचराही येथेच टाकून जातात. अशा निष्काळजी तरुणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.