प्रभात वृत्तसेवा पिंपरी – राज्यातील १५८ पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षक/सहायक आयुक्त पदावर बढती देण्यात आली आहे. यात पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पाच निरीक्षकांची पदोन्नती झाली. तसेच नव्याने चार सहायक पोलिस आयुक्तांची पिंपरी-चिंचवड पोलीस दलात बदली झाली आहे.राज्यातील पोलीस उपअधीक्षक तसेच सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या आणि पोलीस निरीक्षकांची पदोन्नती झाली. राज्याचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी गुरुवारी उशिरा (७ ऑगस्ट) याबाबतचे आदेश दिले. यात पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले सचिन तुकाराम कदम, मुंबई शहरचे दौलत आबाजी साळवे, नवी मुंबईचे विठ्ठल कुबडे तसेच सतीश नांदुरकर हे पिंपरी-चिंचवड दलात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली होऊन आले आहेत. पिंपरी-चिंचवड दलात पोलीस निरीक्षक असलेले सतीश नांदुरकर यांची सहायक पोलीस आयुक्तपदी बढती होऊन त्यांची पिंपरी-चिंचवड दलात बदली झाली. तसेच पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सुनील पिंजन, विश्वजीत खुळे यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभगात पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नतीने बदली झाली. तसेच पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांची बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. सहायक आयुक्तांचे एक पद रिक्त.. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिग गौर यांची भोर उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली झाली. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत सहायक पोलीस आयुक्तांची १२ पदे मंजूर आहेत. त्यातील चार पदे रिक्त होती. नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांमुळे सहायक पोलीस आयुक्तांची संख्या ११ होणार आहे. एक पद रिक्त राहणार आहे.