pimpri news : सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सतर्क राहा

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा नागरिकांना सल्ला
पिंपरी – सायबर गुन्हेगार नागरिकांना “आमिष आणि भीती” या दोन भावनांच्या आधारे फसवतात. कधी मोठा परतावा मिळेल असे अमिष दाखवले जाते, तर कधी वैयक्तिक माहिती प्रसारित करण्याची धमकी दिली जाते. डिजिटल युगात वावरताना थोडी सावधगिरी बाळगली, तर सायबर फसवणुकीचा धोका टाळता येतो, असा सल्ला पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ऑक्टोबर महिना सायबर अवेअरनेस महिना म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आयुक्त चौबे यांनी ऑनलाईन माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या संवादात शाळा, महाविद्यालये, कंपन्या व सोसायट्यांमधील तब्बल १२ हजार प्रतिनिधींनी सहभाग घेतला. विविध प्रश्नांना आयुक्तांनी प्रत्यक्ष उत्तरे देत सायबर सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले.
“फेक जॉब लिंक”, “डिजिटल अरेस्ट”, “लोन एप फसवणूक” आणि “म्यूल अकाउंट” या नवीन प्रकारांनी नागरिकांना सापळ्यात ओढले जात असल्याचे त्यांनी सांगितले. “कोणतेही अधिकृत कंपनी नोकरीसाठी पैसे मागत नाही; अनोळखी खात्यांतून पैसे आल्यास तात्काळ पोलिसांना कळवा,” असा सल्ला त्यांनी दिला.
सायबर फसवणुकीत सर्वाधिक आयटी प्रोफेशनल्स बळी पडत असल्याचे चौबे यांनी नमूद केले. “तांत्रिक ज्ञान असूनही हव्यासामुळे लोक फसतात; म्हणून प्रत्येक व्यवहारात दोन-स्तरीय प्रमाणीकरण (Two-factor Authentication) आणि ‘https://’ असलेली वेबसाइट वापरा,” असेही त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अलीकडेच चायनीज मास्टरमाइंडचा फसवणुकीचा गट उध्वस्त केल्याची आठवण करून देत आयुक्तांनी सायबर पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी नागरिकांना डिजिटल जगात जबाबदारीने वावरत “विश्वास ठेवा, पण पडताळा करूनच क्लिक करा” असा मोलाचा संदेश दिला.





