प्रभात वृत्तसेवा पिंपरी – राज्यातील एक प्रगत शहर असूनही, पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना आजही दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या प्रशासनाच्या अक्षमतेमुळे वाढली असून, सध्या शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा कमी दाबाचा आणि अनियमित होत असल्यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. शहराला अतिरिक्त पाणी मिळेपर्यंत तसेच पाणीपुरवठा दररोज होईपर्यंत शहरातील बांधकामांवर बंदी घालावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे. त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.त्यानुसार, एका बाजूला सध्याच्या नागरिकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला महापालिका कोणतीही दूरदृष्टी न ठेवता असंख्य नवीन बांधकामांना भरमसाट परवाने देत आहे. हे धोरण पूर्णपणे जनता विरोधी असून, आहे त्या तुटपुंज्या पाणी व्यवस्थेवर अतिरिक्त आणि अनावश्यक भार टाकला जात आहे. जोपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला दिवसातून दोनवेळेस पुरेसा आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत शहरात नवीन बांधकामांना कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये. सध्या चालू असलेल्या बांधकामांना त्वरित स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात यावी. तसेच, भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी, पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र धरण उभारण्याच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.