प्रभात वृत्तसेवा पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात रिक्षाचालकांकडून सुरू असलेल्या जादा भाड्याच्या सक्तीने आणि मीटरमधील फेरफारामुळे प्रवासी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. वाहतूक वाढ, शहराचा विस्तार आणि ऑनलाइन ॲप सेवा उपलब्ध झाल्यानंतरही रिक्षाचालकांची मनमानी काही कमी होताना दिसत नाही. ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या ॲपवर आधारित सेवांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता; मात्र आता पुन्हा जादा भाडे मागणी, भांडण, आणि संघटनांच्या दडपशाहीमुळे पूर्वीचेच प्रश्न कायम असल्याचे चित्र दिसत आहे. प्रवाशांच्या तक्रारीनुसार, ॲपवर एखाद्या प्रवासाचे भाडे ५०० रुपये दिसत असले तरी प्रत्यक्षात काही रिक्षाचालक ७०० रुपये मागत आहेत. “मीटरप्रमाणे भाडे” असे सांगत ते जादा पैसे वसूल करतात. अनेकदा प्रवासी मीटर लावायलाच नकार देतात, तर काहींच्या मीटरमध्ये फेरफार केलेले असल्याचेही उघडकीस आलेले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षित, पारदर्शक भाड्याच्या अपेक्षांना तडा जात आहे. रिक्षा स्टँडवर संघटनांची ‘मक्तेदारी’ कायम पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी परिसरातील अनेक रिक्षा स्टँडवर काही संघटनांनी सक्तीची पकड निर्माण केली आहे. त्या स्टँडवर फक्त त्यांच्या संघटनेसंबंधित रिक्षालाच उभे राहू दिले जाते. इतर स्वतंत्र आणि प्रामाणिक रिक्षाचालकांना दूरच्या स्टँडवर जाण्यास भाग पाडले जाते. यातून त्यांचा वेळ व पैसा वाया जातो, तसेच प्रवाशांचीही गैरसोय होते. रिटर्न भाड्याची जुनी प्रथा पुन्हा डोके वर काढत आहे.. कधीकाळी शहरातील उपनगरांमध्ये लोकवस्ती विरळ हेाती. रहदारी कमी असल्याने रिटर्न भाडे घेण्याची प्रथा होती. पण आज ॲप सेवांमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटली होती. तरीही काही रिक्षाचालक आता पुन्हा जादा भाड्याची मागणी करताना दिसतात. जादा भाडे देण्यास नकार दिल्यास प्रवाशांशी उग्र वाद, अपशब्दांचा वापर, धमक्या आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ हे चित्र चिंताजनक आहे. ‘क्लिकर’ ॲपचा गैरवापर – प्रामाणिक चालकांवर अन्याय.. लांबचे भाडे स्वतःकडे यावे म्हणून काही चालक ‘क्लिकर’ नावाचे ॲप वापरत आहेत. त्यामुळे त्या परिसरातील प्रत्यक्ष जवळ असलेल्या इतर चालकांना भाडे मिळण्याची संधी हिरावली जाते. अनेक चालक ॲपवर भाडे स्वीकारतात, पण प्रवाशांनी फोन केल्यावर “जादा भाडे द्या, नाही तर येत नाही” असे सांगून प्रवास नाकारतात. प्रवाशांचा असा रोष आहे की, ॲपवरील भाडे नसेल परवडत तर बुकिंग स्वीकारू नये प्रवाशांची मागणी आहे की “ॲपवर जे भाडे दिसते तेवढेच घ्या. ते नसेल परवडत, तर बुकिंगच स्वीकारू नका.” मीटरची सक्ती करून जादा भाडे आकारण्याऐवजी ॲप-तंत्रज्ञान पारदर्शक असल्याने त्याचा वापर अधिक वाढवावा, अशीही प्रवाशांची मागणी आहे. प्रशासनाकडे अपेक्षा वाढल्या.. सततच्या तक्रारी, सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि नागरिकांमधील असंतोष यामुळे अनेकांना प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा आहे. अनधिकृत मक्तेदारी, जादा भाडे, मीटर फेरफार आणि प्रवाशांशी होणारी वागणूक, यावर त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक म्हणत आहेत. बाइक टॅक्सीची गरज.. पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव रिक्षाने प्रवास करावा लागतो. एका प्रवाशाला प्रवास करायचा असला तरी तीन प्रवाशांचे भाडे द्यावे लागते. जर शहरात बाइक टॅक्सी सुरू झाली तर प्रवाशांना स्वस्तात आणि जलद प्रवासाची संधीही मिळेल.