फलकांचे अतिक्रमण : कर्मचाऱ्यांना कामे करताना अडथळा
देहुरोड – तीर्थक्षेत्र देहू परिसरात शासकीय इमारती, मुख्य प्रवेशद्वार (कमान), सार्वजनिक चौक तसेच विद्युत खांबांवर कोणत्याही प्रशासनाची परवानगी न घेता व्यावसायिक जाहिरात फलकांनी अतिक्रमण केले आहे. या फलकामुळे विद्युत कर्मचाऱ्यांना कामे करताना अडथळा निर्माण होत आहे. फुकट्या जाहिरातबाजीमुळे परिसराला बकालपणा वाढत असून, अशा फलकांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
तीर्थक्षेत्र देहू परिसरामध्ये नागरिकरण दिवसेंदिवस वाढत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनार्थ प्रति दिन 15 ते 20 हजार भाविक आणि पर्यटक देहूत ये-जा करीत असतात. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत परिसरामध्ये विविध ठिकाणी कामे झाली आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
याशिवाय देहूगाव आणि देहुरोड परिसरामध्ये शासकीय इमारती, मुख्य प्रवेशद्वार, इंद्रायणी नदी पूल, सार्वजनिक चौक तसेच शासकीय विद्युत खांबावर गुंठेवारी जमिनी विक्री, घरे-दुकाने भाड्याने देणे, प्रॉपर्टी, कोचिंग क्लासेस, ब्युटी पार्लर, इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री असे विविध व्यावसायिक जाहिरातीचे फलक लावण्यात आले आहे.
याबाबत कोणत्याही प्रकारची संबंधित प्रशासनाकडून तसेच ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतली नसल्याचे उघड होत आहे. अशा या फलकामुळे परिसराला बकालपणा, तर आला आहेच. मात्र या फलकामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत खांबावर असलेल्या फलकांमुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना विद्युत खांबावरील कामे अथवा पथदिवे दुरुस्ती करताना अडथळा निर्माण होत आहे. या फलकामुळे एखादा कर्मचारी कार्यरत असताना दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा सर्व फलकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.