पिंपरी – सध्या शहरात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी दोन्ही शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि जितेंद्र ननावरे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, वरिष्ठ नेते आणि माजी नगरसेवक नाना काटे व अजित गव्हाणे उपस्थित होते. माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे हे चिंचवडमध्ये सक्रिय असून चिंचवड विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली आहे. तर जितेंद्र ननावरे हे पिंपरीत सक्रिय असून त्यांनी युवासेनेची देखील जबाबदारी सांभाळली आहे. या दोन माजी नगरसेवकांचे आपपल्या प्रभागात वर्चस्व आणि चांगला जनसंपर्क आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश खूपच महत्त्वाचा मानला जात आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. सर्व प्रभागात चांगले उमेदवार मिळावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीत उत्साहाचे वातावरण विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठी पडझड झाली होती. त्यानंतर योगेश बहल यांच्या हातात शहराध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आली. शहराध्यक्ष बहल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते नाना काटे यांनी पक्ष सोडून गेलेल्या सर्व माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात आणले. आता माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासोबत मिळून राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी इतर पक्षातही सुरुंग लावत आहेत. सर्वच प्रभागात तुल्यबळ उमेदवारांसाठी प्रयत्न सुरू आहेत.