स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीला अजित पवारांचा प्रतिसाद बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी पदाधिकारी सज्ज पिंपरी – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मुंबई येथे पार पडली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गटाची बैठक गुरुवारी (दि. ६) मुंबई येथे पार पडली. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडवर सत्ता मिळविण्यासाठी स्वबळावर लढण्याची मागणी केली. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वबळाबरोबरच काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करावी लागणार असल्याचे देखील सूचित केले. मात्र, यावरून महापालिका स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यामध्ये नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक मुंबई येथे झाली. सायंकाळी साडेचार वाजता मीटिंग सुरू झाली. एक तासांचा वेळ शहराला दिला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट, माजी आमदार विलास लांडे, कार्याध्यक्ष फजल शेख, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे आदी उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला शहरातील निवडणुकीबाबतचा आढावा पवार यांनी घेतला. त्यावर सुरुवातीलाच स्थानिक जेष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवरची परिस्थिती सांगितली. पिंपरी- चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचा गड पुन्हा मिळविण्यासाठी स्वबळावरच लढले पाहिजे, अन्यथा पुन्हा हातातून सत्ता जाईल, अशी मागणी केली. भाजप किंवा शिवसेनेबरोबर युती करू नये, आपल्या उमेदवारांवर अन्याय होईल, अशीही मागणी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद पवार यांनी दिला असल्याने राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतरांना दिल्लीत विचारावे लागते अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुकीची स्थानिक पातळीवरील पार्श्वभूमी पाहता, ही निवडणूक स्वबळावर लढावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा. पिंपरी- चिंचवडमध्ये आपण काम केले आहेत. २०१७ चा अपवाद वगळता, पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व राहिले आहे. त्यासाठी सर्वांनी काम करा. इतर पक्षांमध्ये दिल्लीला विचारावे लागते. मात्र, आपल्याकडे असे नाही. निवडणुकीवर माझं थेटपणे लक्ष असेल. अजितदादांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ही निवडणूक स्वबळावर लढत बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्या तपासण्यास सांगितल्या आहेत. सोडत झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक होणार आहे. तसेच कार्यकारिणीला देखील मंजुरी दिली आहे. – योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.