Pimpri : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरू केली निवडणुकीची तयारी

पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील तयारी सुरू केली असून नुकतीच पक्षाच्या शहर कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षांच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी कोअर कमिटी जाहीर केली होती.
या कमिटीची बैठक नुकतीच पार पडली असून विशेष बाब म्हणजे पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम पानसरे यांनी या बैठकीत सहभाग घेत शहरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला कोअर कमिटीचे बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. तर काही पदाधिकारी कामानिमित्त बाहेर असल्याने ते कल्पना देऊन अनुपस्थित होते, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पक्षाचे शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी सांगितले की, एकदा प्राथमिक तयारी झाली की खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांचा मेळावा घेणार आहोत.
तसेच रविवारी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे शहरात येणार असून त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक चिंचवड गाव येथील विरंगुळा केंद्र येथे होणार आहे.
इच्छुकांकडून मागविले अर्ज
पक्षाचे शहर सरचिटणीस जयंत शिंदे यांनी सांगितले की, इच्छुकांकडून अर्ज मागवले असून विधानसभा निहाय अर्ज स्वीकृती प्रतिनिधी अर्ज स्वीकारणार आहेत. यात संपूर्ण शहरासाठी शहराध्यक्ष तुषार कामठे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, भोसरी विधानसभा काशिनाथ जगताप, इम्रान शेख, पिंपरी विधानसभा सुलक्षणा शिलवंत, संदीप चव्हाण, चिंचवड विधानसभा सुनिल गव्हाणे आणि तुषार कामठे इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार आहेत. वरील पदाधिकाऱ्यांकडे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.
कोअर कमिटीच्या माध्यमातून निवडणूक नियोजनाला आम्ही सुरुवात केली आहे. सर्वप्रथम निवडणुकीला उमेदवार म्हणून इच्छुक असणाऱ्या पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर संघटने बाहेरील इतर ज्या इच्छुकांनाराष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवायची आहे अशा सगळ्यांचे अर्ज आम्ही मागवत आहोत.
अशा इच्छुकांना पक्षाशी संपर्क करता यावा यासाठी विधानसभानिहाय दोन-दोन प्रतिनिधींची आणि शहर पातळी वर दोन प्रतिनिधींची आम्ही निवड केली आहे. इच्छुक उमेदवारांची माहिती जमा झाल्यानंतर निवडणुकीची पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत.- आजम पानसरे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
‘गेले पाच- सात वर्ष पिंपरी- चिंचवड महारपालिकेत अतिशय भोंगळ कारभार सुरू असून आता तो बदलण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ज्या शरद पवार साहेबांनी हे शहर उभे करण्यात आणि घडवण्यात मोलाची भूमिका पार पाडली त्या पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आम्ही जोमाने कामाला सुरुवात केली आहे.’- देवेंद्र तायडे, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.





