Pimpri : ‘मिसिंग लिंक’ला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर नाव द्या

खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पर्यायी रस्त्याचे (मिसिंग लिंक) काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या जूनपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, असा अंदाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने व्यक्त केला आहे. दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिसिंग लिंक मार्गाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, खंडाळा घाटातील हा मार्ग ब्रिटिशांना दाखविण्याचे ऐतिहासिक कार्य वीर शिंग्रोबा धनगर यांनी केले होते. मात्र, स्वातंत्र्याची मागणी केल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्या बलिदानाची दखल घेऊन बोरघाट मिसिंग लिंकला त्यांचे नाव देण्याची गरज असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.
धनगर समाजातील या महान हुतात्म्याचे सदैव स्मरण व्हावे यासाठी बोरघाटात नव्याने तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा बोगदा’ असे नाव द्यावे. वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे शौर्य आणि त्यांचा इतिहास नव्या पिढीला समजावा व त्यांच्या कार्याला उचित सन्मान मिळावा, यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे पडळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पाविषयी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे. या पर्यायी रस्त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासातील अंतर तीस मिनिटांनी कमी होणार आहे. पर्यायी रस्त्यावरील लोणावळा येथून जाणाऱ्या खोपोली एक्झिटपासून ते सिंहगड इस्टिट्यूटपर्यंत असणाऱ्या १९.८ किलोमीटर अंतराच्या बोगद्यांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
बोरघाटात नव्याने तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पास वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आम्ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली होती. आमदार पडळकर यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून मुख्यमंत्र्यांनीही मागणीची दखल घेतली आहे. सरकारने या मार्गाला हुतात्मा शिंग्रोबा यांचे नाव दिल्यास, तो त्यांच्या कार्याचा खरा गौरव असेल.
– दत्तात्रय शेडगे, धनगर समाजाचे नेते, आत्करगाव





