Pimpri: ‘अर्धवट माहिती घेऊन अपप्रचार केला जातोय’

खालापूर : आदिवासी विभाग आणि सामाजिक विभाग यांना गेल्या वर्षी किंवा त्याआधीच्या वर्षी जितका निधी दिला जात होता, त्यापेक्षा आपल्या अर्थसंकल्पामध्ये तुलनेने अधिक निधी दिला आहे.
अधिकच्या निधीमधून लाडकी बहीण योजनेला १० टक्के राखीव निधी दिला जातो. यामध्ये ३ हजार कोटींची अधिक वाढ दिलेली आहे. त्यामुळे मुळ निधीला धक्का लावलेला नाही, असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेची अर्धवट माहिती घेवून अपप्रचार केला जात असल्याचे सांगत तटकरे यांनी विरोधकांना फटकारले.
खालापूर तालुक्यातील वडवळ ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण करण्यासाठी प्रमुख पाहण्या म्हणून मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत विचारले असता, त्यांनी हे उत्तर दिले. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी आणि सामाजिक विभागाचा निधी पळविल्याचा आरोप होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे तटकरे यांनी ठणकावून सांगितले.
आदिवासी विभाग आणि सामाजिक विभागात आम्ही नुसते पैसे दाखविलेले नाही, तर त्या विभागांचे बजेट देखील वाढविले आहे. नियमाप्रमाणे आम्ही पैसे दाखविले आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.





