पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला माथेरान – डोंगरांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये सकाळपासून पुन्हा एकदा पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. पावसाळ्यामुळे काही महिन्यांपासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन गुरूवारपासून (दि. ६) पुन्हा सुरू झाली आहे. या रेल्वे प्रवासाने पर्यटक आणि माथेरानप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले आहे. पहिली गाडी नेरळ येथून सकाळी ८.५० वाजता सुटून माथेरानकडे रवाना झाली. पहिल्याच दिवशी सकाळपासून नेरळ स्टेशनवर मोठी गर्दी दिसली. निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहात ट्रेनचे स्वागत केले. गाडी सुटताच डोंगराच्या कुशीतून पुढे जाणाऱ्या या प्रवासाने सर्वांनाच पुन्हा जुन्या आठवणींमध्ये नेले. हिरवाईने नटलेल्या दऱ्या, वळणावळणाचे ट्रॅक आणि निसर्गाचे मोहक सौंदर्य पाहताना अनेक पर्यटकांनी मोबाइलमध्ये हे क्षण टिपले. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव ही रेल्वे सेवा दरवर्षी जून ते ऑक्टोबरपर्यंत थांबवली जाते. यावर्षीही मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावरील काही ठिकाणी दुरुस्तीचे आणि सुरक्षेचे काम करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हिरवा सिग्नल दिला आणि मिनी ट्रेनचा नियमित प्रवास सुरू झाला. पावसाळ्यानंतर माथेरानचा निसर्ग जिवंत झालेला असताना, या टॉय ट्रेनच्या सुरूवातीने पर्यटनाला नवा वेग मिळणार आहे, यात शंका नाही. लाल मातीचे रस्ते, थंडगार हवा आणि हिरव्या टेकड्यांमध्ये धावणारी ही मिनी ट्रेन पुन्हा एकदा माथेरानचे सौंदर्य अधिक खुलवते आहे.