Pimpri : लोणावळ्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात

लोणावळा : लोणावळा परिसरात येणार्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिले.
लोणावळा येथील महावितरण विश्रामगृह येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात येणार्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत गाडे, नायब तहसीलदार अमोल पाटील, शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरण सोनावणे, नगर पालिका प्रशासन अधिकारी संतोष खाडे, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंडे आदी उपस्थित होते.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, लोणावळा परिसरात थंड हवेची ठिकाणे, कार्ला लेणी, एकविरा देवीचे मंदीर आहेत, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परिसरातील अपघात, श्वानदंश, सर्पदंश, मधमाशी व वटवाघूळाचे हल्ले, अंमली पदार्थ व दारुचा पुरवठा या बाबी विचारात घेता प्रथमोपचार, पोलीस मदत, स्वच्छता, प्रदूषण, पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसोबतच अवैध गुटखा व अंमली पदार्थ वाहतूक विक्री करणार्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही आदी गोष्टी प्राधान्याने कराव्यात.
एकविरा देवीच्या यात्रेवेळी मधमाशा निर्मूलन मोहीम राबवावी. मधमाशापासून बचाव करण्यासाठी संरक्षणात्मक मार्गदर्शिका तयार कराव्यात; जेणेकरून पर्यटकांना त्रास होणार नाही. या उपाययोजनांची पर्यटकांना माहिती होण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधे उपलब्ध राहतील, याबाबत दक्षता घ्यावी.
पर्यटकांसाठी हेल्पलाईन सुविधालोणावळा पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीच्या दृष्टीने शहरी भागासाठी 9850112400 आणि ग्रामीण भागासाठी 9146032971 असे हेल्पलाईन क्रमांक सुरु केले आहेत. पर्यटकांनी या क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गोर्हे यांनी केले आहे. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही, पर्यायाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी नेहमी दक्ष रहावे.
नगरपरिषदेने उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे
लोणावळा नगर परिषदेने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे. जलपुनर्भरण, सौर ऊर्जा निर्मिती, तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासोबत प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्यादृष्टीने डास निर्मूलन मोहीम आयोजित करावी. नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन करावे.
स्थानिक नागरिकांच्या अडचणीदेखील सोडवाव्यातसार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय इमारती, विश्रामगृहातील कक्षांच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. महसूल विभागाने तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करुन नागरिकांच्या अधिकाधिक अडीअडचणी निकाली काढाव्यात, असे निर्देशही डॉ. गोर्हे यांनी दिले.





