वडगाव मावळ : येथील जुन्या मुंबई – पुणे महामार्गालगत असलेल्या एका भंगार गोदामाला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. उन्हाच्या तीव्रतेत भंगार गोदामातील सर्व साहित्य अगोदरच तापलेले असताना सायंकाळी आग लागताच काही वेळात संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि एमआयडीसी अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तब्बल पाच तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत गोदामातील बहुतांश चिजवस्तू जळून खाक झाल्या होत्या. तसेच आग लागल्यानंतर संपूर्ण वडगाव मावळ शहराचा विजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तब्बल दोन तास संपूर्ण शहर अंधारात होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याठिकाणी आग भडकली होती, परंतु अग्निशमन दलाने वेळीच आग रोखली. यानंतर गोदाम मालकाने जेसीबीच्या सहाय्याने सामान व राडारोडा बाजुला केला तेव्हा आग पूर्णतः विझली. दरम्यान या घटनेनंतर महामार्गालगत असणारी भंगार गोदामे आणि तिथल्या सुरक्षिततेचा अभाव, हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत.