पिंपरी – मोशी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक ४, ६, ९ तसेच गंधर्व नगरी परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या परिसराला महावितरणच्या सेक्टर १० उपकेंद्रातून कार्यान्वित जलवायु विहार या उच्चदाब विद्युत वाहिनीमार्फत वीजपुरवठा केला जातो. परंतु, या वाहिनीवर कुठेही तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण लाइन बंद ठेवावी लागते, त्यामुळे पूर्ण परिसर अंधारात जात होता. आता येथे आरएमयू अर्थात रिंग मेन युनिट बसविण्यात येत असून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण घटणार आहे. ही समस्या नागरिकांनी स्थानिक आमदारांसमोर मांडली असता आमदार महेश लांडगे यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर कार्यकारी अभियंता देवकर आणि सहाय्यक अभियंता नरवडे यांच्यासह जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. पाहणीदरम्यान तीन ठिकाणी आरएमयू बसविण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या. जलवायु विहार सोसायटी बाहेर, साधू वासवानी स्कूल कॉर्नर आणि महाराजा चौक परिसर या ठिकाणी आरएमयू बसवण्यात येत आहेत. दोन आरएमयू युनिट्स आधीच उपलब्ध झाल्यानंतर तिसरे युनिटही प्राप्त झाले आहे. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे यांनी केली. यावेळी माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे आणि सहकारी उपस्थित होते.