नवी सांगवी : केंद्र सरकारने देशभरात वाहनांसाठी एचएसआरपी (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) सक्तीने लागू केली आहे. मात्र या आदेशाच्या अंमलबजावणीच्या नावाखाली पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात काही अधिकृत व अनधिकृत गॅरेज, दुकानदार आणि अॅक्सेसरीज विक्रेते वाहनचालकांची आर्थिक लूट करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. जुनी नंबर प्लेट काढून नवी एचएसआरपी बसवताना काही ठिकाणी वाहनधारकांकडून अवैधरित्या अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. अनेकांना जबरदस्तीने “हे नियम आहेत” असे सांगत जुनी नंबर प्लेट परत दिली जात नाही. काही ठिकाणी या प्लेट्स विक्रेत्यांकडेच जमा करून स्क्रॅपमध्ये टाकल्या जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. नियमांची चुकीची अंमलबजावणी वाहनचालकांचे म्हणणे आहे की, सरकारने एचएसआरपी लावणे सक्तीचे केले असले तरी जुन्या नंबर प्लेटसाठी कोणताही स्क्रॅप दर किंवा परत न देण्याचा नियम अधिकृतपणे नाही. तरीही गॅरेजमधून वाहनधारकांना जुन्या प्लेटबाबत कोणतीही पावती न देता त्या परत देण्यास टाळाटाळ केली जाते. यावर अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी वाहन चालकांनी मागणी आहे. वाहन मालकांकडून काही ठिकाणी ५० ते ३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. नागरिकांची मागणी – ‘एचएसआरपी’ लागू करताना पारदर्शकतेचा आग्रह या पार्श्वभूमीवर वाहनधारकांकडून मागणी करण्यात येत आहे की, एचएसआरपी लावताना ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा अधिकृत पोर्टलवरच मर्यादित ठेवावी, आणि नंबर प्लेट बदलताना जुन्या प्लेटसाठी रीतसर पावती किंवा स्क्रॅपचे प्रमाणपत्र देण्यात यावे. अन्यथा सर्व प्रक्रियेला संशयास्पद स्वरूप येत असून त्याचा गैरफायदा लुटमार करणारे विक्रेते घेत आहेत. वाहन मालकांना आवाहन वाहनधारकांनी एचएसआरपी बसवताना अधिकृत पोर्टलवरूनच प्रक्रिया करावी, अनधिकृत ठिकाणी बदल करू नये, आणि जुन्या नंबर प्लेट परत मागण्यासाठी रीतसर मागणी करावी. अन्यथा ही लूट थांबणार नसल्याचा इशारा वाहतूक तज्ज्ञांकडून दिला जात आहे. प्रशासनाने लक्ष घालावे आणि लुटमारीला आळा घालावा, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे. काकडे पार्क, चिंचवड येथील एका अधिकृत सेंटरवर एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी वाहन चालक गेले असता प्रत्येकाकडून जुनी नंबर प्लेट काढण्यासाठी ५० रुपयांची मागणी करण्यात आली. याबाबत विचारणा केली असता त्याने पावतीवरील ’जुन्या नंबर प्लेट काढण्यासाठी अधिकृत फिटमेट सेंटर जबाबदार राहणार नाही’, या नियमावर बोट ठेवत ५० रुपयांची मागणी केली. पैसे द्यायचे नसल्यास स्वतः नंबर प्लेट काढून आणा, असे तेथील कर्मचार्याने सांगितले. जुनी नंबर प्लेट काढण्यासाठी फिटमेट सेंटर चालकाकडून पैशाची मागणी करणे गैर आहे. याबाबत नागरिक dyrto-14-mh!gov.in यावर तक्रार करू शकतात. तक्रार आल्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल. – संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड