Pimpri : लेझर लाइटचा सर्रास होतोय वापर

पिंपरी : गल्लीबोळातील कार्यक्रम, लग्न सोहळे आणि लाइव्ह कॉन्सर्ट रंगतदार करण्यासाठी लेझर लाइटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या लाइटला बंदी असतानाही तो पोलिसांसमोरच वापरला जात आहे. वैमानिकांसह सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या लेझरच्या वापरामुळे अनेक अपघातही घडले आहेत. विशेषतः लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमात याचा सर्वाधिक वापर होत आहे. हे रोखण्यासाठी काहीच उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.
विमानतळाच्या सात किलोमीटरच्या परिघात लेझर लाइटला बंदी आहे. याचे उल्लंघन करून त्या लाइटचा वापर वाढला आहे. फक्त त्याला रंग वेगवेगळा वापरला जात आहे. यामुळे विमानाच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हे फोकस इतके पॉवरफुल असतात की ५०० ते १००० मीटर उंचपर्यंत जातात. विमान टेक-ऑफ आणि लँडिंग होताना त्यांची उंचीही ५०० ते १००० मीटरपर्यंत असते. काही वर्षांपूर्वी लेझर लाइट आणि उच्च दर्जाच्या फोकसमुळे त्रास होत असल्याची तक्रार वैमानिकांनी विमानतळ प्राधिकरणाकडे केली होती. तेव्हापासून विमानतळाच्या परिसरातील ७ किलोमीटर परिसरात लेझर लाइट व फोकस वापरण्यावर निर्बंध आहेत.
दरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये नेहमीच कार्यक्रम होत असतात. कार्यक्रमाचे हे ठिकाण नागरिकांच्या लक्षात यावे यासाठी राजकीय पक्षांसह विविध संघटनांकडून लेझर लाइटचा वापर केला जातो. तसेच सध्या गणेश विसर्जन मिरवणूक किंवा इतर धार्मिक कार्यक्रमाच्या मिरवणुकीतही लेझर लाइटचा वापर केलाज तो. या लाइट एवढ्या जवळ असतात की आसपासच्या नागरिकांच्या डोळ्यांना इजाही होऊ शकते. मात्र पोलीस प्रशासनाने अशा एकही कार्यक्रमाच्या आयोजकावर किंवा लेझर लाइटचा पुरवठा करणार्या मालकावर गुन्हा किंवा खटला दाखल केलेला नाही.
अशी घ्या काळजी
– लेझर लाईट पाच मिलीवॅट पेक्षा कमीचा असावा.
– ले लाईट शोपासून जास्त दूर राहणे हितकारक
– थेट लेझर लाईट डोळ्यात शिरणार नाही याची काळजी घेणे.
– लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
– लेझर लाईटचा झोत वरच्या दिशेने किंवा आकाशाकडे असावा जेणेकरून लोकांच्या डोळ्यात त्याचा थेट शिरकाव होणार नाही-
– ‘लेझर शो’ ची नोंदणी व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची सक्ती करावी.
– लेझर लाईटमुळे कोणालाही डोळ्याच्या तक्रारी असतील तर त्यांना ताबडतोब नेत्रतज्ञाच्या सल्याने उपचार करावा.





