कान्हे : मावळ तालुक्यातील कान्हे नायगाव ग्रामपंचायतींची मुदत १६ जानेवारी २०२५ रोजी संपली आहे. पंचायत समितीने अहवाल पाठवूनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्यापही प्रशासकाची नियुक्ती केली नाही. ना लोकप्रतिनिधी ना प्रशासक अशी परिस्िथती असल्यामुळे गावापातळीवरील अनेक कामांना खीळ बसली आहे. प्रशासकाची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी कान्हे नायगाव येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
कान्हे नायगाव ग्रामपंचायत मुदत दि. १६ जानेवारी रोजी संपून जवळपास एक महिना होत आले आहेत. याबाबत गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मुदत संपल्याचा अहवाल पाठवला आहे.
या अहवालाबाबत त्वरित निर्णय होणे गरजेचे असतानाही मुदत संपून एक झाले तरी अद्यापपर्यंत ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक झाली नाही. यामुळे ग्रामस्थ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना काम करू देत नाही, विविध विकासकामे प्रलंबित असल्याने संबंधितांना स्थानिक रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. इकडे प्रशासन साथ देत नाही, तिकडे गावात गावकरी साथ देत नसल्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
यामुळे जिल्हा परिषद प्रशासन हे ग्रामपंचायत प्रशासक निवडीला गांभिर्याने घेताना दिसत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक नियुक्त न केल्यामुळे ग्रामपंचायतीसंबंधी विविध कागदपत्रांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.