Pimpri : कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपरी : एका १७ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे.
अंकुश बबन भेंडेकर (वय २४), शिवाजी निवृत्ती वाबळे (वय ५५) आणि रमेश शिवाजी गांगर्डे (वय २६) असून, दोघे प्रशिक्षक असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अंकुश भेंडेकर हा जामिनावर आहे. फिर्याद पीडितेच्या मामाने २६ फेब्रुवारी २०२५ रोजी वाकड पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित युवती भोसरीतील एका संस्थेत प्रशिक्षण घेत होती. २५ फेब्रुवारी रोजी ती घरी न परतल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, तिने आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितल्यानंतर गुन्ह्यात ‘ॲट्राॅसिटी’ व बाल लैंगिक अत्याचाराची कलमे वाढवण्यात आली.
संशयितांनी तिला परदेशी स्पर्धेचे आमिष दाखवत नेवासा, भोपाळ येथील हॉटेलमध्ये गुंगीचे औषध देत अत्याचार केला. त्यानंतर श्रीलंकेतील स्पर्धेसाठी प्रायव्हेट अकॅडमी जॉइन करावी लागेल, असे सांगितले. शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा तपास करत पुराव्याच्या आधारे नव्याने आरोपपत्र सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.





