Pimpri : प्रशासकीय राजवटीत वाढता वाढे दौरे

पिंपरी : दहा दिवसांपूर्वीच पार पडलेल्या महापालिका अधिकार्यांच्या गरूडमाची दौर्याचा खर्च अदा केला जात नाही तोच आता पुन्हा आणखी एका दौर्याची टूम निघाली आहे. लडाख येथील दोन संस्थांमध्ये सहा दिवसांच्या प्रशिक्षण दौर्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त (1) यांच्यासह एकूण 30 घाऊक अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. प्रवास, निवास, भोजन खर्चासह प्रशिक्षणाकरिता प्रतिव्यक्ती जीएसटी 51,906 रूपये खर्च येणार आहे. या संपूर्ण दौर्याकरिता येणार्या 15, 57,600 रुपये खर्च येणार आहे.
लडाखमधील स्टुडंटस् एज्युकेशनल अॅण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख ही संस्था विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर लक्ष केंद्रीत करते तर हिमालयीन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज् लोकांना त्यांच्या स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्ये शिकवून पर्यायी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देते. या दोन्ही प्रकल्पांची कौशल्ये महापालिका शाळेतील शिक्षिकांना आत्मसात करून त्याचे धडे शालेय विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. मास्टर ट्रेनर समितीमध्ये महापालिकेच्या शाळेतील 20 ते 25 शिक्षकांचा समावेश असणार आहे. याशिवाय सेवाभावी संस्थांचे तीन प्रतिनिधीदेखील या दौर्यात सहभागी होणार आहेत.
या 6 दिवसांच्या दौर्यासाठी 15, 57,600 रुपयांचा खर्च होणार असून, त्यापैकी 80 टक्के रक्कम 12, 46 हजार 080 रुपये संबंधित संस्थांना दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधींच्या काळात आतापर्यंत अनेक दौरे पार पडले आहेत. तर आता प्रशासकीय राजवटीत गेली तीन वर्षांत महापालिका अधिकारी व कर्मचार्यांचे अनेक दौरे पार पडले असून, त्यावर करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप होत आहे.
दहा दिवसांपूर्वीच पार पडला गरुड माची दौरा
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापनेस 2032 मध्ये 50 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन 50 शहर धोरण ठरविण्यासाठी 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत आयोजित विचार मंथनात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह एकूण घाऊक स्वरुपात 49 वरिष्ठ अधिकारी सहभाग झाले होते. निसर्गाच्या सान्निध्यात ताम्हिणी घाटात असणार्या गरुडमाचीवर अधिकाऱ्यांनी शहर धोरणावर विचारमंथन केले. कार्यशाळेवर कामगार कल्याण विभागाच्या लेखाशिर्षावरील 8 लाख 54 हजार 320 रुपये खर्च करण्यात आले.
थंड हवेची ठिकाणांना विशेष पसंती
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 70 अधिकार्यांसाठी लोणावळ्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये 16 जुलै 2022 रोजी स्वच्छ भारत सर्वेक्षणाबाबत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. लोणावळ्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना हे विचारमंथन पार पडले होते. यामध्ये आयुक्त, तिन्ही अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, लिपिक, कॉम्प्युटर ऑपरेटर यांचा समावेश होता. पालिका अधिकार्यां व्यतिरिक्त सल्लागार संस्थेच्या दोन प्रतिनिधींचाही समावेश होता. या सर्वांचे चहा, नाष्टा, जेवणासाठीचे 2 लाख 33 हजार 50 रुपयांचे बिल हॉटेलला आगाऊ देण्यात आले होते.





