जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासच्या परिसरात उष्णता वाढू लागली आहे. सूर्य आग ओकू लागल्याने सर्वसामान्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात ४० अंश सेल्सीअस तापमानाची नोंद होत आहे. दिवसेंदिवस तापमान उसळी घेत आहे. तापमानात वरचेवर वाढ होत असून नागरिक हैराण होऊ लागले आहेत. या कडक उन्हाने अबालवृद्धांची पुरती दमछाक झाल्याचे दिसून येत आहे. रस्ते सामसूम होऊ लागले आहेत. बाजारपेठेत शुकशुकाट दिसू लागला आहे. पिंपरी चिंचवडकरांसाठी दरवर्षी येणारा उन्हाळा तसा नवा नाही. मात्र यंदा तापमान मर्यादा ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराच्या काही भागात होत असलेल्या विकासकामांच्या वेळी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे उडणारे धुळीचे लोट या सर्व प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बर्फगोळा, ज्यूसला मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात बच्चे कंपनीला बर्फाच्या गोळ्याचे भलते आकर्षण असते. विविध रंग चवीत उपलब्ध असलेला गोळा ज्येष्ठांमध्येही लोकप्रिय आहे. यामुळे आईस्क्रीम पार्लरची संख्या वाढली आहे. बर्फाचा गोळा घेण्यासाठी लहान मुले गर्दी करीत असल्याचे दिसून येते. सध्या पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात रसवंती व ज्यूसची दुकाने थाटण्यात आली असून ज्यूसची मागणी वाढली आहे. उष्णतामानामुळे दिवसा शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असून रात्री उशिरापयर्यंत बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत आहे. एरवी आठ ते नऊ वाजता दरम्यान बंदी होणारी व्यावसायिक प्रतिष्ठानेही रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची पहायला मिळत आहे. उपनगरात उन्हाचे सर्वाधिक चटके उष्णता वाढीचा परिणाम उपनगर भागात सर्वाधिक जाणवत आहे. मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होत आहे. मे महिन्यात तापमान कमी न झाल्यास आणखी पाणीटंचाई भेडसावणार, या भीतीने अनेक जण ग्रासले आहेत. नाक्यावरच्या मजुरांना दुपारच्या दरम्यान उष्णतेने प्रचंड त्रास होत आहे. कडक उन्हाचा चढता पारा पाहता आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडावे. सोबत पाणी बॉटल असू द्यावी, उष्माघाताचा धोका टाळावा, असे आवाहन डॉक्टर करीत आहेत. उन्हाचा त्रास जाणवल्यास करा हे उपाय सैल कपड्यांचा वापर करावा रुग्णास तातडीने सावलीत अथवा पंख्याखाली बसवावे थंड पाणी भरपूर प्रमाणात पिण्यास द्यावे नजीकच्या आरोग्य केंद्र किंवा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा उन्हाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी कमी तापमान असताना करावी. उष्णता शोषून घेणारे सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा. – डॉ. विनायक पाटील, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वायसीएम रुग्णालय