Pimpri : ‘वायसीएम’मध्ये हेल्थ कार्ड कागदावर

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यात यावी, यासाठी 2010 सालापासून ई-हेल्थ कार्ड प्रणाली सुरु करण्यात आली. एका खासगी कंपनीकडे या कार्डचे काम देण्यात आले होते.
मात्र, 2020 पासून ‘वायसीएम’मध्ये पीव्हीसी स्मार्ट कार्ड स्वरुपातील हेल्थ कार्ड देणे बंद असून त्याऐवजी एका चिठ्ठीवर हे कार्ड प्रिंट करुन दिले जात आहे. त्यामुळे रुग्णांचा डिजिटल डाटा जतन होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे एका रुग्णाचे एकाहून अधिक एमआरडी नंबर तयार होत असल्याने रुग्णाची मेडिकल हिस्ट्री जाणून घेण्यात डाॅक्टरांना देखील अडचणी येत आहेत.
‘वायसीएम’मध्ये या प्रणालीमुळे अचूक निदान, वैद्यकीय उपचार, रुग्णांचा वैद्यकीय इतिहास जतन करणे सोपे आहे. ही सेवा पूर्ण ऑनलाइन आहे. कित्येक वर्षानंतरही रुग्ण उपचारासाठी आल्यास केसपेपर काढताना पहिल्यांदा हेल्थ कार्ड विषयी विचारणा करण्यात येते. त्यामाध्यमातून डॉक्टरांना रुग्णांची पूर्व माहिती मिळते. त्यानंतर पुढील उपचार दिले जातात. त्यामुळे रुग्णांना ढिगभर कागदपत्रे जवळ बाळगावी लागत नाहीत. वेळेची बचत होते.
सुरुवातीला नवीन कार्ड काढताना ३० रूपये आणि नंतरच्या उपचारासाठी दरवेळी दहा रूपये केसपेपरसाठी घेतले जात होते. मात्र, करोनामध्ये २०२० सालापासून हे हेल्थ कार्ड बंद करण्यात आले. त्यानंतर हेल्थ कार्ड देणेच बंद करण्यात आले. आता टोकनच्या चिठ्ठीवर हे कार्ड प्रिंट करुन दिले जात आहे.
एक-एका रुग्णांचे २० कार्ड
हेल्थ कार्डवर रुग्णाचा युनिक नंबर असतो. त्याला एमआरडी नंबर म्हणतात. उपचारासाठी रुग्ण आल्यानंतर पहिल्यांदा केस पेपर काढला लागतो. त्यावेळीच रुग्णाला हेल्थ कार्ड चिठ्ठीवर प्रिंट करुन दिले जाते. या रुग्णाला दरवेळी आल्यानंतर एमआरडी नंबर सांगितला, तरी ओपीडीचे टोकन मिळते. या एमआयडी नंबरमध्ये वैद्यकीय इतिहास जतन केला जातो. मात्र, ही चिठ्ठी गहाळ झाल्यास किंवा चिठ्ठीवरील शाही पुसल्यास रुग्णांना नवीन एमआरडी क्रमांक काढवा लागतो. त्यामुळे एक-एका रुग्णांचे २० एमआरडी नंबर तयार झाले आहेत. त्यामुळे त्या रुग्णांचा वैद्यकीय इतिहास जतन होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
हेल्थकार्डचे प्रिंटर धूळखात
अगोदर हेल्थ कार्डसाठी ३० रुपये घेतले जात होतो. आता हेल्थ कार्ड देणे बंद असल्याने केसपेपरचे २० रुपये घेतले जात आहेत. त्यावेळी पीव्हीसी हेल्थ कार्डसाठी महापालिकेने खेरदी केलेल्या प्रिंटीग मशीन धूळखात पडून आहेत. होलसेल बाजारात अशा एका पीव्हीसी स्मार्ट कार्डची किंमत पाच रुपयांपेक्षाही कमी असताना महापालिका कार्ड खरेदी करण्याची तसदी घेत नाही. महापालिकेच्या या उदासीनतेमुळे नागरिकांना दर्जेदार सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे.
वायसीएममधील संपूर्ण कारभार पेपर व प्लॅस्टिक लेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे हेल्थ कार्डसाठी प्लॅस्टिकचे स्मार्ट खरेदी करण्यात आलेले नाही. सर्व महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी सेंट्रलाइज डिजिटल प्रणाली सुरु करण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे वायसीएममधील ठेकेदारीला मुदत वाढ देण्यात आलेली नाही.
– डॉ. अभयचंद्र दोदेवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका





