कामशेत : पुणे जिल्हा परिषदेच्या नोकर भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत मावळ तालुक्यातील कामशेत ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्याने जिल्हा परिषदेच्या आवारात नोटांची उधळण करत आंदोलन केले. मात्र पूर्व परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे सदर कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते खडकाळा ग्रापंचायतीमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरल्या जातात. भरतीमध्ये अन्याय झाल्याचा सिरसाट यांचा आरोप आहे. तीन वर्ष न्याय मागतोय, एकाही अधिकाऱ्याने न्याय दिला नाही. अधिकारी मुजोर आहेत, हे मिनी मंत्रालय नाही तर, मनी मंत्रालय आहे, अशा घोषणा देत म्हणत सिरसाट यांनी गळ्यातील पैशांच्या नोटा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ उधळल्या. नोटा उधळल्यानंतर तिथेचे थांबले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सन २०२१-२२ साली दहा टक्क्यांची नोकर भरती झाली होती. त्या भरतीमध्ये अन्याय झाल्याचा दावा सिरसाट यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले होते.