Pimpri : बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या

बीड : येथील सरपंचाची अमाणूष हत्त्या झाली. परभणी येथील कस्टडीमध्ये तरुणाचा खून झाला. राजगुरुनगर येथे अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करुन खून करण्यात आला. या हत्त्याकांडामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्या खात्यावरील नियंत्रण सुटल्याचे दिसत आहे. या तिन्ही प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावे. धनंजय मुंडेचा राजीनामा त्वरीत घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केली.
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, परभणी येथील तरुणाचा कस्टडीमध्ये झालेला मृत्यू आणि राजगुरुनगर येथे दोन मुलींचा लैंगीग अत्याचार करुन केलेला खून या तिन्ही प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील मराठा क्रांती मोर्चा, विविध राजकीय पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने पिंपरी-चिचंवड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदारांकडे आरोपींच्या फाशीची मागणी करण्यात आली. शिवसेनेचे संजोग वाघेरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, मारूती भापकर, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, नरेंद्र बनसोडे, शिवशंकर उबाळे, अरुण पवार आदींसह शेकडो लोकांचा आंदोलनात सहभाग होता.
संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे म्हणाले, बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी व कार्यकर्ते आहेत. या घटनेचा निष्पक्ष तपास होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. वाल्मिक कराड याच्याबरोबर खुनाच्या घटनेतील आरोपी हे मुंडे यांच्याशी निगडीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या मंत्र्याला गृहमंत्री का पाठीशी घालत आहेत, असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला आहे.
मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे दिंडवडे निघाले आहे. बीड प्रकरणातील तपासात प्रगती दिसत नाही. बिघडलेली राज्यातील परिस्थिती हाताळता येत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. राज्याला निष्पक्ष बिगर राजकीय निर्भीड कठोर प्रशासक असलेला पूर्णवेळ गृहमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव यांनी केली.





