Pimpri : मुलांना जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लस द्या – संदीप काटे

पिंपळे सौदागर : जापनीज मेंदूज्वर या जीवघेण्या आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा व मुलांना जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लस द्यावी, असे आवाहन चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक संदीप काटे यांनी केले.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना (Japanese Encephalitis – JE) ही लस देण्यात आली.
जापनीज मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार असून तो प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. हा आजार मेंदूच्या मज्जातंतूंवर गंभीर परिणाम करू शकतो. देशातील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते. या आजारातून ३०-४० टक्के बरे झालेल्या रुग्णांमध्ये आजीवन मज्जासंस्थेशी संबंधित अपंगत्व दिसून येते.
शाळेच्या प्राचार्य सुविधा महाले यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी आरोग्यविषयक कार्यक्रम शाळेत नेहमीच राबविलेले जातात. त्यांनी जापनीज मेंदूज्वर या आजाराची लक्षणे सांगितली. तसेच उपस्थित पालकांमध्ये आजाराबाबत जनजागृती केली.





