तळेगाव ,दाभाडे : दोन वर्षांपूर्वी सुरु केलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेत अभ्यास करणारे चार विद्यार्थी शासकीय सेवेत वरिष्ठ पदावर रुजू झाले. नगर परिषदेकडून मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी त्या विद्यार्थ्यांचा नगर परिषद कक्षात सत्कार केला. राजू असवले, मनीष कुडे, अर्चना जाधव या तिघांची महसूल सहाय्यक म्हणून तर वैष्णवी यादव यांची मुंबई पोलीसमध्ये निवड झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी तळेगाव दाभाडे परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शासनाच्या उच्य पदावर अधिकारी म्हणून काम करावे, या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू केली. या भ्यासिकेतून अनेक विद्यार्थी अभ्यास करून शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. नगर परिषदेकडून या अभ्यासिकेसाठी पुस्तके, संगणक, आॅनलाइन क्लासेस आदी बाबीची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी या सुविधांचा लाभ घेत आहेत. तसेच नगर परिषदेच्या शाळामधून भविष्यातील अधिकारी तयार व्हावेत, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन देखील केले जात आहे. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी नगर परिषदेतील वरिष्ठ अधिका-या कडून विद्यार्थ्यांचे क्लास देखील सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. येथील गणेश मोफत वाचनालयाकडून देखील स्पर्धापरीक्षेसाठी अभ्यासिकेचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी देखील यापूर्वी अनेक विद्यार्थी परीक्षेत उतीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू झाले आहे.