पिंपरी उड्डाणपुलाला डागडुजीची गरज

अधिकाऱ्यांकडून पाहणी ः पूल बांधणीला 30 वर्षे पूर्ण, झाली दूरवस्था

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्‍त दौऱ्या दरम्यान पिंपरीतील उड्डाणपुलाची पाहणी केली. या पाहणी अहवालात उड्डाण पुलाची डागडुजी करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची चर्चा करण्यात आली. या पुलाच्या मजबुतीकरणासाठी महापालिका प्रशासन निधी उपलब्ध करुन देणार आहे. तर पुलाची डागडुजी रेल्वे प्रशासनामार्फत केली जाणार आहे. या पाहणी दौऱ्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ही मोठी बाजारपेठ असून, दररोज शेकडो नागरिक याठिकाणी येत असतात. याशिवाय दैनंदिन कामकाजानिमित्त नागरिक, विद्यार्थी व व्यावसायिकांची कायम वर्दळ सुरू असते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला समांतर लोहमार्ग असल्याने, तो ओलांडण्यासाठी 1989 साली रेल्वे प्रशासनाने इंदिरा गांधी उड्डाणपुल बांधला. त्याकरिता महापालिकेनेच निधी उपलब्ध करुन दिला होता.

या पुलाला आता 30 वर्षे पूर्ण झाली असून, उड्डाणपुलाचे सरासरी आयुर्मान 40 वर्षे मानले जाते. या पुलाचे कठडे ढासळले आहेत. याशिवाय खांबांचे प्लॅस्टर निघाले असून, अनेक ठिकाणी लोखंडी गज दिसत आहेत. या पुलाची दूरवस्था झाल्याने महापालिका प्रशासनाने या पुलाची खासगी संस्थेमार्फत तपासणी केली. त्याचा अहवाल महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा अहवाल 10 नोव्हेंबर 2019 रोजी रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आला होता. तसेच या अहवालाबरोबरच या पुलाच्या दुरुस्तीविषयी महापालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला विचारणा केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नव्हता.

दरम्यान, मुंबईत पादचारी पुल कोसळल्यानंतर महापालिका व रेल्वे प्रशासनावर सर्वसामान्यांमधून टिकेची झोड उठली होती. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे अधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले. यामध्ये रेल्वेचे विकासकुमार श्रीवास्तव, ओशपालसिंग यादव, महापालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता डी.डी. पाटील, कनिष्ठ अभियंता बाळासाहेब शेटे, सी.व्ही. कांड या खासगी संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

एम्पायरच्या रॅम्पनंतर वर्दळ कमी होण्याची शक्‍यता

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एम्पायर इस्टेट येथे लोहमार्ग आणि महामार्गाला पार करणारा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र, या उड्डाणपुलावरून काळेवाडीहून थेट ऑटोक्‍लस्टरसमोर येता येते. महामार्गावर येण्यासाठी आवश्‍यक असलेल्या दोन्ही बाजूच्या रॅम्पचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावर येण्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.