पिंपरी – निगडी ते चिंचवड स्टेशन या सर्व्हिस रस्त्याचे अखेर, महामेट्रो व्यवस्थापनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. खड्डेमय रस्त्यावर डांबरीकरण केल्याने वाहनचालक समाधान व्यक्त करीत आहेत. यापुढे तेथे खड्डे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात येत आहे. पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीत मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेट हा सर्व्हिस रस्ता आणि बीआरटी मार्ग महापालिकेने महामेट्रोकडे हस्तांतरीत केला आहे. त्या रस्त्याचे अंतर ४.५ किलोमीटर इतके आहे. त्या रस्त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी महामेट्रोकडे देण्यात आली आहे. सध्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक ते चिंचवड स्टेशनपर्यंत मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. पावसामुळे तसेच, मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने काँक्रीटचा रस्ता, डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वर्दळीच्या वेळेत वाहतूक संथ होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत. तातडीने खड्डे दुरूस्तीबाबत महापालिकेने महामेट्रोला तीन वेळा पत्र पाठविले. मात्र, त्याला महामेट्रो व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नाही. रोष वाढत असल्याने अखेर महामेट्रोने रस्ते पक्के करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी त्या रस्त्यावरील वाहतूक टप्प्या टप्प्याने काही काळ बंद ठेवून इतरत्र वळविण्याची मागणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केली होती. त्यानुसार वाहतूक पोलिस व महापालिकेने काही रस्त्यावरील वाहतूक वळवली आहे. त्यानंतर महामेट्रोने रस्ते दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. निगडी ते चिंचवड स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने दुरूस्ती काम करण्यात येत असल्याचे महामेट्रोच्या अधिकार्यांनी सांगितले. –